ठाणे : बांधकाम व्यवसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठजणांवर मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असतानाच त्यापाठोपाठ आणखी एक खंडणीचा गुन्हा परमबीर सिंह, पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह पाचजणांवर ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

आपल्या काकावर मोक्काची कारवाई करण्याची तसेच भावाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी देऊन एकूण ४ कोटी ६८ लाख रुपयांसह दोन जमिनी बळाविल्याचा आरोप मिरा-भाईंदरमधील एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्यावर केला आहे. या गुन्ह्यामुळे सिंग यांच्यासह मणेरे हेअडचणीत आले आहेत.

वालधुनी नदीत बुडणाऱ्या  युवकाला वाचविले

कल्याण : कल्याणमधील वालधुनी नदीत शुक्रवारी दुपारी एक तरुण वाहत जात असल्याचे पुलावरील पादचाऱ्यांना दिसले. पोलिसांनी दोराच्या साहाय्याने या तरुणाला वाचविले.  मद्याच्या नशेत असलेला हा २४ वर्षाचा तरुण गणेश घाट भागातून  नदीत उतरला होता.

पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तो वाहून जाऊ लागला. तो वाहून शहाड येथील पुलाच्या खांबाला अडकला. तेथे त्याने खांबाचा आधार घेतला. त्याला नदीत दोर टाकून बाहेर काढण्यात आले. त्याला तात्काळ उपचार करण्यासाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आले.  पोलीस घटनास्थळी आले नसते तर हा तरुण वेगवान पाण्या बरोबर वाहून गेला असता.