कल्याण – कल्याणमध्ये एका २९ वर्षांच्या महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका साप्ताहिक आणि यूट्यूब वाहिनीच्या पत्रकाराविरोधात उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला विवाहित असतानाही आरोपी तिला लग्नासाठी गळ घालत होता. त्यास तिने नकार दिल्याने आरोपीने तिच्या पतीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

पीडित महिला पत्रकाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार आणि आरोपी पत्रकार हे कल्याणमध्ये राहतात. पोलिसांनी सांगितले, पीडित महिला या पत्रकार आहेत. त्या आरोपी पत्रकाराच्या यूट्यूब वृत्त वाहिनीमध्ये नोकरी करतात. आरोपी पत्रकाराने या महिलेशी कार्यालयात काम करत असल्याने ओळख वाढवली. तिच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्याने पीडित महिलेला लग्न करण्याची गळ घातली. तिला सौदी अरेबियात पर्यटनासाठी नेण्याची तयारी दर्शवली. लग्नानंतर पलावा गृहसंकुलात अलिशान घर घेण्याचे आमिष आरोपी पत्रकाराने महिलेला दाखविले.

हेही वाचा – कल्याण डोंबिवली पालिकेतील दोन अभियंत्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटिस, मलवाहिन्या सफाई कामातील ठेकेदाराच्या कामात त्रुटींकडे दुर्लक्ष

आपले लग्न झाले आहे. आपणास मुले आहेत. त्यामुळे तुमच्याशी लग्न करू शकत नाहीत, असे वारंंवार पीडित महिला आरोपीला सांगत होती. आरोपी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. लग्नाचे आमिष दाखवून, पलावा गृहसंकुलात घर घेण्याचा बहाणा करून आरोपी पत्रकाराने पीडितेला कल्याण, उल्हासनगर परिसरातील लाॅजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. आरोपी पत्रकाराकडून पीडित महिलेला सतत लग्नाची मागणी करण्यात येऊ लागली. हे शक्य नसल्याने एक दिवस पीडित महिला पत्रकाराने आरोपीला तुमच्या वृत्त वाहिनीचे काम आपण सोडत असल्याचे सांगितले. त्याचा राग आरोपी पत्रकाराला आला. त्याने आपल्या वृत्त वाहिनीचे काम सोडले तर आपण तुझ्यासह तुझ्या पतीला मारू, अशी धमकी दिली.

हेही वाचा – डोंबिवली : ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून मजुराला लुटले

पीडित महिलेने सुरुवातीला मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. हा गुन्हा नंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.