एकाच दिवशी चार सोनसाखळी चोऱ्या

एकाच दिवशी चार महिलांच्या गळ्यांतील सोनसाखळी खेचल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

एकाच दिवशी चार महिलांच्या गळ्यांतील सोनसाखळी खेचल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोनसाखळी चोरांना नेस्तनाबूत करण्यासाठी पोलिसांनी कोणतीही प्रभावी उपाययोजना आखली नसल्याचे या घटनांवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
बुधवारी नौपाडा परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचून चोरांनी पोबारा केला. यातील एक घटना ठाणे महापालिका मुख्यालयासमोर घडली. तर कल्याण परिसरातील लालचौकी आणि कोळसेवाडी परिसरात दोन महिलांच्या सोनसाखळ्या खेचण्यात आल्या. या सगळ्या घटना गर्दीच्या आणि बाजारपेठ असलेल्या ठिकाणी घडल्या आहेत.
नौपाडा परिसरात राहणाऱ्या सोनाबाई बंडू जाधव (५८) ए. के. जोशी शाळेजवळून बुधवारी चालत जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी जाधव यांच्या गळ्यातील २२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचले. वर्तकनगर येथील दोस्ती विहार इमारतीत राहणाऱ्या प्रतिभा प्रकाश अडखळे (४६) यांचे ठाणे महापालिकेजवळील ठाणे जनता सहकारी बँकेसमोर मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पाचपाखाडीच्या दिशेने पलायन केले. कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या दीपा विश्वनाथ नायर (३८) यांचे कल्याण येथील काटेमाणवली नाका परिसरातून मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी ४४ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचले. या वेळी नायर यांच्या गळ्यास खरचटले. मंगळसूत्र खेचून चोरटय़ांनी गणपती चौकाच्या दिशेने पळ काढला. कल्याणमधील लालचौकी परिसरात राहणाऱ्या वैशाली सुरेश विश्वाद (६५) आग्रा रोड परिसरात सकाळी चालण्यासाठी गेल्या असता मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी विश्वाद यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरली. या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बेशुद्ध करून दोन लाख लंपास
भिवंडी : येथील वर्धमान कम्पाऊंड परिसरात राहणारे झाकीर इस्लाम चौधरी (३२) बुधवारी धामणकर नाका परिसरातील बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. बँकेत जाण्याआधी मोटारसायकल उभी करण्यासाठी धामणकरनाका पुलाखालील रिक्षा थांब्याजवळ गेले असता पाठीमागून आलेल्या चोरटय़ाने गुंगीचे औषध टाकलेला रुमाल चौधरी यांच्या नाकासमोर धरून त्यांना बेशुद्ध केले. त्यांच्याकडील पिशवीतील दोन लाख सहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४६ हजारांची चोरी
ठाणे : घाईगडबडीत दरवाजा उघडा राहिल्याची मोठी किंमत मुंब्रा परिसरातील एका कुटुंबाला मोजावी लागली आहे. कौसा येथे राहणारे जावेद अहमद सय्यद (४८) नमाज पठण करण्यासाठी मंगळवारी घरातून बाहेर गेले होते. तेव्हा चुकून उघडय़ा राहिलेल्या दरवाजातून चोरटय़ाने घरात प्रवेश केला. दरवाजाच्या मागे अडकवलेल्या जॅकेटच्या खिशातून ४६ हजार पाचशे रुपयांची रोकड व पॅनकार्ड चोरून  नेले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटारसायकल चोरी
ठाणे : गोवंडी येथे राहणाऱ्या मोईन इब्राहिम खान (२९) यांची रविवारी मोटारसायकल डायघर परिसरातील भोलेनाथ नगर भागातून चोरटय़ाने चोरली. अंबरनाथ परिसरात राहणाऱ्या देजू गुप्ता मुल्या (५८) यांची ४ फेब्रुवारी रोजी गजानन महाराज मंदिरामागून मोटारसायकल चोरटय़ाने चोरली. याप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कळवा येथील टीएमटी आगाराच्या पाठीमागील बुधाजीनगर भागात राहणाऱ्या राजेश परशुराम करंदे (४८) यांची राहत्या इमारतीसमोरून मंगळवारी चोरटय़ाने चारचाकी गाडी चोरली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Crime today in thane