कल्याण – महावितरणच्या कल्याण विभागाकडून वारंवार आवाहन करूनही वीज तारांवर आकडे टाकून, वीज मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या कोनगाव परिसरातील आठ वीज ग्राहकांना महावितरणाने दणका दिला आहे. या वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महावितरणच्या टिटवाळा उपविभाग अंतर्गत कोनगाव शाखा अंतर्गत ग्राहक तपासणी मोहिम राबावण्यात आली. यामध्ये एकूण विजचोरीची आठ प्रकरणे उघडकीस आली. या वीज चोरांनी २७ हजार ३९९ युनिट विजचोरी केली असल्याचे निष्पन्न झाले. वीज युनिट वापराप्रमाणे या वीज चोरांना सहा लाख ६१ हजार इतक्या रकमेचा दंड ठोठावण्यात आला.

विजचोरी प्रकरणी ग्राहकांवर सहाय्यक अभियंता धनंजय पाटील यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात भिवंडी येथे वीज कायदा २००३ कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.महावितरण कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, मंडळ अधीक्षक अभियंता विजय फुंदे, कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजचोरीला आळा घालण्यासाठी व विजहानी कमी करण्यासाठी टिटवाळा उपविभाग अंतर्गत कोन शाखा येथे ही मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेत कोन शाखा अंतर्गत वॉटर सप्लाय रोड, पाचमार नगर, तरीपार या परिसरातील आठ वीज ग्राहकांवर विजचोरी बिल न भरल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेत टिटवाळा उपविभाग अंतर्गत उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहाय्यक अभियंता नीलेश शिर्के, तुकाराम घोडविंदे, सहाय्यक अभियंता धनंजय पाटील, सचिन पवार , योगेश चेंदवणकर तसेच कोन शाखा विज कर्मचारी यांनी भाग घेतला.

कोन, टिटवाळा, कल्याण परिसरातील वीज चोरांविरूध्दची ही मोहीम अशीच सुरू ठेवण्यात येणार आहे, असे कारवाई पथक प्रमुखांनी सांंगितले. अशीच कारवाई दोन दिवसापूर्वी महावितरणच्या कल्याण विभागाच्या दक्षता पथकाने शहापूर तालुक्यातील शेणवे गावात केली. प्राप्त तक्रारीप्रमाणे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या निर्देशावरून रात्रीच्या वेळेत ही कारवाई करण्यात आली.

गाव खेड्यात रात्रीच्या वेळेत ग्रामस्थ वीज खांबांंवरील वीज वाहक तारांवर आकडे टाकून तेथून घराचा वीज पुरवठा सुरू करून घेतात. रात्रभर वीज चोरी करून सकाळच्या वेळेत हे आकडे काढून टाकले जातात. ग्रामीण भागातील सुस्थितीत कुटुंबातील काही रहिवासी घरात वातानुकूलित यंत्र, कुलर, शेगड्या, कपडे धुण्याची यंत्रे असल्याने वाढता वीज वापर विचारात घेऊन मीटरमध्ये छेडछाड करून मीटरला आकडी लावून घरातील विजेचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करतात.

महावितरण अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येऊ नये म्हणून एका महिन्यात काही दिवस आकडी न लावता वीज वापर आणि काही दिवस आकडी लावून घरगुती विजेचा वापर करतात. त्यामुळे घरात उच्चदर्जाची विजेवर चालणारी सामग्री असुनही हे रहिवासी महावितरणचे फक्त एक ते दोन हजार रूपये वीज देयक भरतात. प्रत्यक्षात या वीज ग्राहकांचा वीज वापर दरमहा सुमारे पाच ते सहा हजार रूपये असतो, असे एका जाणकाराने सांगितले.