ठाणे – ठाणे तालुक्यात अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत, ठाणे तहसीलदार यांनी कठोर पाऊल उचलले आहे. याप्रकरणी एकूण १०८ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई ठाणे, बाळकुम, बेलापूर, मुंब्रा, दहिसर आदी गावांमधील अनधिकृत उत्खनन करणाऱ्या कंत्राटदार, जमीन मालक आणि कब्जेदारांविरोधात करण्यात येत आहे.

ठाणे तहसील कार्यालयाकडून संबंधितांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. परंतू, अधिकृतपणे करण्यात आलेल्या उत्खननाबाबत शासनाची दंडनीय रक्कम भरण्यात अनेक जमीन मालकांनी टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. तर, काही प्रकरणांमध्ये संबंधितांनी दंडही भरलेला नसून सक्षम न्यायालयाचा कोणताही आदेशही सादर केलेला नाही. त्यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत उत्खनन सुरूच ठेवण्यात आले होते. वारंवार संधी देऊनही शासनाची दंडात्मक रक्कम भरली नसल्यामुळे आता संबंधित कसूरदारांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये संबंधितांची मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील हाती घेण्यात आली आहे.

ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांना विचारले असता, ‘संबंधित प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू होणार आहे. शासनाच्या महसूल व पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील असे त्यांनी सांगितले.