scorecardresearch

डोंबिवलीत बेकायदा इमारती बांधणाऱ्या ११ भूमाफियांवर फौजदारी गुन्हे; ह, फ प्रभागाची आक्रमक कारवाई

डोंबिवलीतील ई, ग आणि ह प्रभागात ६५ बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींवर कारवाईचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांचे आदेश आहेत.

dombiwali illegal building
(डोंबिवली पश्चिमेत कोपर गावमध्ये शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा बांधकाम.)

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणामुळे खडबडून जागे झालेल्या कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामे करणाऱ्या भूमाफियांची बांधकामे जमीनदोस्त करणे, त्यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना नियोजन (एमआरटीपी) कायद्याने गु्न्हे दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग, पूर्वेतील फ प्रभाग अधिकाऱ्यांच्या तक्रारींवरुन पोलिसांनी ११ भूमाफियांविरुध्द ‘एमआरटीपी’चे गुन्हे विष्णुनगर, टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल केले.डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांची विशेष तपास पथकांकडून चौकशी सुरू आहे. त्याच बरोबर आता सक्तवसुली संचालनालयाला सादर करावयाचा ६५ बेकायदा बांधकामांचा अहवाल अंतीम करण्याचे काम पालिका आयुक्तांकडून सुरू आहे.

हेही वाचा >>>ठाकुर्लीत सामूहिक बलात्कार; दोन आरोपींना अटक

डोंबिवलीतील ई, ग आणि ह प्रभागात ६५ बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींवर कारवाईचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांचे आदेश आहेत. ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते, वरिष्ठ लिपिक अरुण पाटील यांनी रेतीबंदर क्राॅस रस्त्यावरील अतिथी बार समोर सात माळ्याची बेकायदा इमारत बांधणाऱ्या बाळाराम गोविंद भोईर, जमीन मालक गोविंद मल्ल्या या भूमाफियांच्या विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली- ठाकुर्ली सामुहिक बलात्कारातील दोन आरोपी अटक

अशाच पध्दतीने, ह प्रभाग हद्दीत रेती बंदर क्राॅस रस्त्यावरील राहुलनगर मध्ये सात माळ्याची बेकायदा इमारत उभारणाऱ्या साईकृपा डेव्हलपर्सतर्फे अनंता उर्फ अनंत सुदाम म्हात्रे, देवीचापाडा यांच्यावर, गावदेवी येथे एन. बी. बंगल्या जवळ सात मजली बेकायदा इमारत उभारणारे जमीन मालक लक्ष्मीबाई सोनू पवार, ओम साई डेव्हलपर्सतर्फे मयुर किशोर वारकेकर यांच्यावर, सुभाष रस्त्यावरील कुंभारखाणपाडा येथे दिशांक सोसायटीच्या बाजुला बेकायदा गाळे बांधल्याने दत्ता भगवान म्हात्रे या माफियावर, जुनी डोंबिवलीतील भारतमाता शाळेसमोर गोपाळ राठोड भूमाफियाने सात माळ्याची बेकायदा माळ्याची इमारत बांधली आहे. माजी साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या काळात या माफियाला नोटीस बजावण्यात आली होती. तरीही माफियाने बेकायदा बांधकाम पूर्ण केले. मोठागाव मधील लोटेवाडीत समर्थ चाळी शेजारी अलीहुल शेख माफियाने सात माळ्याची बेकायदा इमारत बांधली आहे. यामधील एकही माफिया बांधकामाची अधिकृतता सांगणारी कागदपत्रे सादर करुन शकला नाही. ही बांधकामे अनधिकृत घोषित करुन साहाय्यक आयुक्त गुप्ते यांनी त्यांच्या विरुध्द फौजदारी कारवाई केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील फ प्रभाग हद्दीत साहाय्यक आयुक्त भरत पाटील, अधीक्षक जयवंत चौधरी यांनी दोन माफियांवर फौजदारी कारवाई केली. खंबाळपाडा येथे जमीन मालक अनुसया चौधरी यांच्या जमिनीवर शतायु रुग्णालय खंबाळपाडा येथे बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू करण्यात आले. बांधकाम मंजुरीची कागदपत्र भूमाफिया सुनील जयसेकर सादर करू शकले नाहीत. गेल्या वर्षापासून ह प्रभाग अधिकारी जयसेकर यांना बांधकाम थांबविण्यासाठी नोटिसा देत होते. खंबाळापाडा भोईरवाडी मधील शंकेश्वर व्हिला इमारतीच्या बाजुला प्रवीण शांताराम नाईक या माफियाने बेकायदा बांधकाम केल्याने त्यांच्या विरुध्द फौजदारी कारवाई करण्यात आली. टिळकनगर पोलीस ठाण्यात जयसेकर, नाईक यांच्या विरुध्द एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>कळव्याच्या सहाय्यक आयुक्तांनी घेतले बेकायदा बांधकामधारकाकडून २० लाख रुपये; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

“डोंबिवलीत ह प्रभाग हद्दीत आठवड्यातून तीन बेकायदा बांधकामे जमीनदोस्त आणि चार ते पाच एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. इमारतीची पुन्हा बांधणी करता येणार नाही अशा पध्दतीने बांधकामे तोडली जात आहेत.”-सुहास गुप्ते,साहाय्यक आयुक्त,अतिक्रमण नियंत्रण विभाग

“ ‘ईडी’चा तपास सुरू झाल्यानंतर बेकायदा बांधकामांसाठी जमीन देणारे मालक, भूमाफिया, वास्तुविशारद, ज्या पालिका साहाय्यक आयुक्त, विभागीय उपायुक्त, उपायुक्त यांच्या कालावधीत ही बांधकामे उभी राहिली ते अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.”-संदीप पाटील,तक्रारदार व वास्तुविशारद

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 13:55 IST