scorecardresearch

डोंबिवलीतील गुन्हेगाराची नाशिक कारागृहात रवानगी

त्रिशांत दिलीप साळवे (२४) असे गुन्हेगाराचे नाव आहे. तो पिसवली गावातील टाटा नाका, देशमुख होमसमोरील जय मल्हार झोपडपट्टीत राहातो.

crime
(फाईल फोटो)

डोंबिवली : डोंबिवली मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पिसवली, टाका नाका परिसरात अनेक वर्षांपासून दहशतीचे वातावरण, गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या एका २४ वर्षांच्या कुख्यात तरुणाची मानपाडा पोलिसांनी ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षांसाठी गुरुवारी रवानगी केली.

त्रिशांत दिलीप साळवे (२४) असे गुन्हेगाराचे नाव आहे. तो पिसवली गावातील टाटा नाका, देशमुख होमसमोरील जय मल्हार झोपडपट्टीत राहातो. मानपाडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर विविध प्रकारचे आठ गुन्हे दाखल आहेत. टाटा नाका, पिसवली परिसरात त्रिशांतची दहशत होती. घातक शस्त्र बाळगून दिवसाढवळय़ा फिरणे, शस्त्राचा धाक दाखवून लुटणे, शारीरिक इजा करणे, दहशतीचे वातावरण करून विनयभंग करणे, जमाव जमवून गुंडागर्दी करणे, रात्रीच्या वेळेत ओरडा करून शांततेचा भंग करणे असे अनेक गुन्हे त्रिशांतवर दाखल होते.

त्रिशांतच्या उपद्रवाने पिसवली, टाटा नाका भागातील रहिवासी हैराण होते. पोलिसांकडे त्याच्याविषयी अनेक तक्रारी आल्या होत्या. मानपाडा पोलिसांनी त्रिशांतच्या कृत्यांचा अहवाल पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, ठाणे पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता. पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी त्रिशांतवरील गंभीर गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन त्याला एक वर्ष नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून मानपाडा पोलिसांनी त्याची रवानगी गुरुवारी नाशिकला केली. त्रिशांतवरील कारवाईने पिसवली परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Criminal dombivali sent nashik jail shilphata kalyan nashik central jail amy

ताज्या बातम्या