scorecardresearch

डोंबिवलीत दहशत पसरवणार्‍या गुन्हेगाराची नाशिक कारागृहात रवानगी

गंभीर गुन्ह्यांची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे दिले आदेश

(संग्रहीत छायाचित्र)

डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाटा नाका, पिसवली परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका कुख्यात गुंडाची रवानगी मानपाडा पोलिसांनी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात केली आहे. त्रिशांत दिलीप साळवे (२४) असे कारवाई झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो कल्याण शीळ फाटा रस्त्यावरील जय मल्हार नगर पिसवली, टाटा नाका भागात राहत होता.

पिसवली गावच्या हद्दीत टाटा नाका, देशमुख होम्स परिसरात त्याची दहशत होती. घातक शस्त्र जवळ बाळगणे, महिलांचा विनयभंग करणे, जमाव जमून दहशतीचे वातावरण निर्माण करणे, लुटमार करणे, रात्री-अपरात्री आरडाओरडा करून शांततेचा भंग करणे, शस्त्राने इजा करणे असे आठ पेक्षा अधिक गुन्हे त्रिशांत याच्यावर मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल होते. तो सतत टाटा नाका परिसरात गुंडागर्दी करत असल्याने स्थानिक रहिवासी त्याच्या उपद्रवाने हैराण होते. त्रास होऊनही अनेक रहिवासी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास पुढे येत नव्हते.

त्रिशांत याच्या विषयी पोलीस ठाण्यात वाढत्या तक्रारी येऊ लागल्याने मानपाडा पोलिसांनी त्याचा अहवाल पोलीस उपायुक्त, ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना पाठवला होता.

त्रिशांत वरील गंभीर गुन्ह्यांची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी त्याला एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे गुरुवारी त्रिशांत साळवे यांची रवांनगी मानपाडा पोलिसांनी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Criminal spreading terror in dombivli sent to nashik jail msr

ताज्या बातम्या