ठाणे : जिल्ह्याच्या करोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांच्या कालावधीत लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. फेब्रुवारीच्या मध्यानंतर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असल्याचे दिसून आले होते. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात २६९ बाधित करोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र मागील बारा दिवसांच्या कालावधीतच २४१ बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
करोना रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला असून प्राणवायू, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये खाटांचे नियोजन करण्यास आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानंतर जिल्ह्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरला असल्याचे दिसून आले होते. तसेच राज्यातील करोना परिस्थितीदेखील नियंत्रणात आली असल्याने शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले सर्व निर्बंध पूर्णत: शिथिल केले होते. असे असतानाच ठाणे जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णसंख्येत काही अंशी वाढ होऊ लागल्याने खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणेकडून वैद्यकीय संसाधनांची पूर्तता करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
एप्रिल महिन्यात जिल्ह्यात प्रतिदिन ६ ते १० रुग्ण आढळून येत होते. तर मागील दहा ते बारा दिवसांच्या कालावधीत प्रतिदिन २० ते ३० रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात सद्य:स्थितीत करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही १४३ इतकी आहे. यापैकी ५६ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर ८७ रुग्णांचे घरात विलगीकरण करण्यात आले आहे. निर्बंधांचे शिथिलीकरण झाले असले तरीही करोना परिस्थिती नियंत्रणात राहण्याकरिता नागरिकांनीदेखील दक्ष राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात प्राणवायूच्या १४ नवीन टाक्यांची उभारणी
करोना रुग्णसंख्येत हळूहळू वाढ असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून पालिका क्षेत्रांमध्ये तसेच ग्रामीण क्षेत्रांमध्ये नव्याने १० हजार लिटर क्षमतेच्या १४ टाक्यांची सोय करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान प्राणवायूची मोठी कमतरता भासली होती. अशा पद्धतीची परिस्थिती पुन्हा आल्यास रुग्णांना प्राणवायूची कमतरता भासू नये याकरिता या टाक्यांची उभारणी करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील करोना रुग्णालयांना सज्ज राहण्याबरोबरच तेथील अतिदक्षता खाटांची संख्याही वाढविण्याचे कामही आरोग्य विभागाकडून सुरू आहे.
जिल्ह्यात करोनाच्या रुग्णसंख्येत काही अंशी वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. करोनाचा हा प्रादुर्भाव वाढल्यास रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्य विभागातर्फे खाटांबरोबरच मुबलक प्राणवायूची उपलब्धता करून ठेवण्यात येत आहे. नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. – डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक
