मिठाईच्या दुकानांत गर्दी; मात्र दागिने, इलेक्ट्रॉनिक दुकानांत निरुत्साह

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजाराला उत्साहाची झळाळी आली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील मिठाईंच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात दरवर्षीच्या तुलनेत यंदा शुकशुकाट पाहायला मिळाला. वाहन विक्रीला मात्र ग्राहकांनी काहीसा प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

करोनामुळे मागील वर्षी शासनाने टाळेबंदी जाहीर केली होती. त्यामुळे सर्वच सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. ऐन सण- उत्सवात बाजारपेठा बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला होता. या वर्षी करोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथिलता आणली. सण-उत्सवाच्या कालावधीत दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण होते. विविध सवलतीही जाहीर केल्या, तर ग्राहकांना दुकानात आल्यावर प्रसन्न वाटावे यासाठी आकर्षित अशी सजावट करण्यात आली होती.

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहन खरेदीला प्राधान्य दिले जाते. मात्र यंदाच्या वर्षी वाहन खरेदी वगळता सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. मात्र मिठाई खरेदीसाठी दुकानात मोठी गर्दी झाली होती. करोनाच्या प्रादुर्भावामुळे मिठाई व्यापाऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता. मात्र यंदा दसऱ्यानिमित्त मिठाई खरेदीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे मिठाई विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे ठाण्यातील टिप-टॉप मिठाई दुकानाचे देवाशिष दास यांनी सांगितले. यंदा ८० टक्के  मिठाईंची विक्री झाल्याचे मिठाई विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

मिठाईंची ८० टक्के विक्री

लाडू, श्रीखंड, म्हैसूर पाक, जिलेबी या पदार्थांचे दर इतर मिठाईच्या दराच्या तुलनेत कमी असल्यामुळे यंदाच्या वर्षी या मिठाईंना मोठ्या प्रमाणात मागणी होती. तर, काजूकतली, बर्फी, पेढे अशा इतर मिठाईंच्या मागणीत ३० ते ३५ टक्के घट झाली असल्याची माहिती मिठाई विक्रेत्यांनी दिली. मिठाई खरेदीला जवळपास ८० टक्के ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला आहे. ३८० ते ४८० रुपये किलोने लाडू विकले गेले. म्हैसूर पाकची किंमत २८० ते ३८० तर जिलेबीची २८० ते ४८० रुपये किलो होती.

करोनामुळे मागील दोन वर्षे बाजार घसरला आहे. यंदा दसऱ्याच्या मुर्हूतावर बाजारात चांगली परिस्थिती असेल, अशी आशा व्यापाऱ्यांना होती. मात्र यंदा ग्राहकांचा खरेदीसाठी फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत  ४० टक्क्यांनी विक्रीत घट झाली आहे. सराफ बाजारात ३० ते ३५ टक्क्यांनी ग्राहकांची संख्या रोडावली होती. – मितेश शहा, अध्यक्ष, नौपाडा व्यापारी मंडळ, ठाणे

दसरा सणापूर्वीच एक महिना अगोदर एमआयडीसीतील कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना देण्यासाठी मिठाई पुड्यांची नोंदणी केली जायाची. गेल्या दीड वर्षात कठोर निर्बंधांमुळे सण, उत्सव साजरे केले गेले नाहीत. आता निर्बंध उठविण्यात आले आहेत. बहुतांशी उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत, तरी कंपन्यांकडून मिठाईसाठी यावेळी नोंदणी झाली नाही. सामान्य ग्राहकांनी मात्र मिठाई खरेदीसाठी गर्दी केली होती. – श्रीपाद कुळकर्णी, मिठाई विक्रेता, डोंबिवली