Harbour Line AC Local Train Delay: मे महिन्यातील उकाड्यातून प्रवाशांना काहीसा दिलासा मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘थंडावा देणारा दिलासा’ या उपक्रमाच्या माध्यमातून सेंट्रल रेल्वेने १ मे पासून हार्बर मार्गावरील एसी लोकल गाड्यांचे सुधारित वेळापत्रक लागू केले. हे सुधारित वेळापत्रक जारी करुन अवघा एक आठवडा झाला असतानाच रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या एसी लोकलमुळे नियमित गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून एसी गाड्यांनी प्रवास करणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. या निषेधार्थ संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे.

तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने

१ मे २०२६ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल दरम्यान काही एसी लोकल सेवा सुरू केल्या आहेत. परंतू, या लोकल सेवा सुरु करताना नॉन एसी लोकल सेवांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. विस्कळीत झालेल्या या वेळापत्रकाचा फटका आता प्रवाशांना बसू लागला आहे. सीएसएमटी स्थानकातून सायंकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी नविन एसी लोकल सुरु करण्यात आली आहे. परंतू , एसी लोकलने प्रवास करणे सर्वच प्रवाशांना परवडणारे नाही त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी नॉन एसी लोकलने प्रवास करण्यासच प्राधान्य देत आहे. ६ वाजून ३३ मिनिटांनी निघणाऱ्या या एसी लोकलमुळे ६ वाजून ४१ मिनिटांनी निघणाऱ्या नॉन एसी लोकलला सीएसएमटी स्थानकात येण्यास विलंब होत आहे. नॉन एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.त्यामुळे या गाडीला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यात, ही लोकल दररोज १० ते १५ मिनिट उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या गर्दीत आणखी भर पडत आहे. आधीच क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या डब्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत असून प्रवाशांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होत असल्याची खंत एका प्रवाशाने व्यक्त केली.

पनवेल गाडीसाठी अशी होते गर्दी

सीएसएमटी स्थानकातून संध्याकाळी ६:३३ वाजताच्या एसी लोकलपूर्वी हजारो कार्यालयीन कर्मचारी ६:२६ वाजताच्या पनवेल धिम्या लोकलवर अवलंबून असतात. मात्र, प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सीएसएमटीकडील बाजूचे तीन डबे महिलांसाठी राखीव असल्याने सर्वसामान्य प्रवाशांसाठी डब्यांची संख्या कमी पडते. यामुळे फलाटावर प्रचंड गर्दी होत आहे. तसेच एसी लोकलसाठी देखील यादरम्यान फलाटावर लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे ६.२६ च्या गाडीत चढताना प्रवाशांची गैरसोय होत असून विशेषतः गर्दीच्या वेळेत रोजचा त्रासदायक प्रवास अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे प्रवासी सांगतात.

या निर्णया विरोधात प्रवाशांची स्वाक्षरी मोहीम….

पनवेलकडे प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांच्या एका गटाने मध्य रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवला असून, त्यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना उद्देशून मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. ‘एसी आणि नॉन-एसी लोकल सेवांचे नियोजन अधिक कार्यक्षम पद्धतीने करण्यात यावे आणि सामान्य प्रवाशांच्या गरजांना प्राधान्य दिले जावे,’ अशी मागणी या गटाने केली आहे.