ठाणे: विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना भारताचा समृद्ध सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा प्रत्यक्ष अनुभवता यावा, या उद्देशाने ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई यांच्या ‘म्युझियम ऑन व्हील्स’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम शनिवार, ११ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जोशी – बेडेकर महाविद्यालय परिसरात होणार आहे.

आजच्या डिजिटल युगात इतिहासाचा अभ्यास प्रामुख्याने पुस्तके, छायाचित्रे किंवा ऑनलाइन माध्यमांपुरता मर्यादित राहतो. मात्र, वस्तुसंग्रहालयातील ऐतिहासिक वस्तू, पुरातत्त्वीय अवशेष आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन प्रत्यक्ष घडल्यास इतिहास अधिक जिवंत आणि प्रभावीपणे समजतो. याच विचारातून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने ‘म्युझियम ऑन व्हील्स’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे संग्रहालय थेट शैक्षणिक संस्थांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

इन्स्टिट्यूट फॉर ओरिएंटल स्टडी, ठाणे आणि व्हीपीएमचे के. जी. जोशी कला महाविद्यालय व एन. जी. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे ठाण्यात आयोजन करण्यात आले आहे. या फिरत्या संग्रहालयात भारताच्या समृद्ध इतिहास, कला आणि संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या दुर्मीळ प्रतिकृती, पुरातत्त्वीय वस्तू, माहितीपूर्ण प्रदर्शन तसेच परस्परसंवादी (इंटरॅक्टिव्ह) प्रदर्शने पाहण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ वस्तू पाहण्यापुरते नव्हे, तर त्यांच्या ऐतिहासिक संदर्भांची माहिती समजून घेण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने हा उपक्रम अभ्यासक्रमाला पूरक ठरणार आहे. संशोधक, इतिहास अभ्यासक आणि सर्वसामान्य नागरिकांनाही भारताच्या सांस्कृतिक वारशाचे व्यापक दर्शन घडणार आहे.

विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, इतिहासप्रेमी तसेच नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राच्यविद्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि डॉ. महेश बेडेकर यांनी केले आहे.

इतिहास केवळ वाचू नका, तर तो प्रत्यक्ष अनुभवा, हा संदेश देणारा ‘म्युझियम ऑन व्हील्स’ उपक्रम ठाण्यातील इतिहासप्रेमींसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी निश्चितच एक आगळावेगळा अनुभव ठरणार आहे. या उपक्रमामुळे संग्रहालयाचा अनुभव थेट महाविद्यालयीन परिसरात उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना इतिहास, पुरातत्त्व, कला आणि संस्कृती यांविषयी प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.