डिसेंबर-जानेवारी महिना उलटला तरी ठाणे जिल्ह्य़ांतील वेगवेगळ्या शहरांमधील उत्सवांची रंगत मात्र अद्याप कायम आहे. कळव्यामध्ये ‘संघर्ष’च्या वतीने ठाणे फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून येत्या गुरुवारपासून या महोत्सवास सुरुवात होईल. वारली चित्रकलेतील योगदानाबद्दल पद्मश्री मिळालेले जीव्या सोमा माशे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल. १४ फेब्रुवारीपर्यंत सुरू असणाऱ्या या महोत्सवात संगीत, कला, खाद्यसंस्कृती यांच्याशी संबंधित विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
सुप्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल आणि एस. एम. पंडित या दर्जेदार चित्रकारांच्या शंभर वास्तववादी चित्रांचे दालन आणि त्याचबरोबर गायतोंडे, तयेब मेहता, एम. एफ. हुसेन, ए. पेस्टोन्जी, एम. आचरेकर यांसारख्या काही दर्जेदार चित्रकांराची वैशिष्टय़पूर्ण अशा कलाकृती २५०० चौरस फूट कला दालनामध्ये मांडण्यात येणार आहे. तसेच येथे थ्रीडी चित्रांचेही एक विशिष्ट असे दालन असणार आहे. तसेच लहानग्यांसाठी येथे सायंकाळी ६ ते १० या वेळेत खास आविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. बच्चेकंपनीचा लाडका ‘मोगली’ त्यांच्या मनोरंजनासाठी येथे उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर सागरातील सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजेच मासे. येथे विविध प्रकारचे एक हजारांहून अधिक मासे पाहण्याची संधी बच्चेकंपनीला या महोत्सवामध्ये मिळणार आहे.

’गुरुवारी सायंकाळी ६ ते ९ : प्रसिद्ध अक्षर रचनाकार अच्युत पालव यांच्या अक्षर कलाकृतीचे प्रात्यक्षिक
’गुरुवारी सायंकाळी ७ ते रात्री १० : सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि स्वप्निल बांदोडकर यांचा ‘स्वरा’ हा गायन कार्यक्रम.
’शुक्रवारी सायं. ७ ते १० : ३० कलाकारांच्या ‘फोक्स व्ॉगन बॅण्ड’चा अभूतपूर्व सांगीतिक नजराणा
’शुक्रवारी दुपारी ३ ते ६ : शेफ नीलेश लिमये यांच्या खमंग मेजवाणीच्या कुकरी शो.
’शनिवारी सायं. ७ ते १० : मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ सुधीर फडके ते अजय अतुल असा प्रवास मांडणारा ‘सप्तरंग’ हा कार्यक्रम.
’शनिवारी दुपारी ३ ते ६ : ख्यातनाम शेफ संजीव कपूर आणि देवरथ जातेगावकर यांचा कुकरी शो.
’ शनिवार सायं.६ ते ८ : मनोज शेळके यांच्यातर्फे व्यक्तिचित्रांचे प्रात्यक्षिक.
’शनिवारी सायं. ७ ते १० : संगीत क्षेत्रातील रत्नांच्या सुरेल गाण्यांची सांगितिक मैफलीतून शंकर जयकिशन ते शंकर, एहसान, लॉय पर्यंतचा प्रवास मांडणारा ‘दी गॉडस् ऑफ मेलोडी’ हा कार्यक्रम.
’शनिवारी दुपारी ३ ते ६ : शेफ कविता पाटील यांचा कुकरी शो.
’शनिवारी : सुप्रसिद्ध मूर्तिकार भगवान रामपुरे त्यांच्या कलेची प्रात्यक्षिके.
कधी- ११ ते १४ फेब्रुवारी, वेळ : दुपारी ३ ते रात्री १०
कुठे- ९० फूट रोड, पारसिक नगर, कळवा

किशोर प्रधान, विजू खोटे ज्येष्ठांच्या भेटीला
हिंदी-मराठी चित्रपट, मालिकांमधून आपल्या हास्याभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सुप्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान आणि विजू खोटे येत्या शनिवारी ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधणार आहेत. ठाण्यातील ‘वाविकर आय इन्स्टिटय़ूट’तर्फे ‘जॉयफुल लिव्हिंग, ग्रेसफुल एजिंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये किशोर प्रधान आणि विजू खोटे उपस्थितांना हसत-खेळत कसे जगावे, याविषयी गप्पांमधून मार्गदर्शन करणार आहेत.
कधी- शनिवार, ६ फेब्रुवारी, वेळ : दुपारी ४ ते ५
कुठे- वाविकर आय इन्स्टिटय़ूट, पाचवा मजला, माजिवाडा, ठाणे (प.)

लोकसंगीत आणि पाश्चिमात्य वाद्यांचा संगम
‘बॅण्ड’ म्हटलं की डोळयासमोर रॉक, पॉप संगीताचे बॅण्ड येतात. पण लोकसंगीत आणि पाश्चिमात्य वाद्यांचा संगम घडवून आणला आहे ‘इंडियन सागा रॉक बॅण्ड’! नॅशनल स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टचे विद्यार्थी ध्रुव राठोड, केनिल सांगवी, प्रयाग शेनॉय, राहुल नायक, तेजस पारेख हे रॉक बॅण्डचा नजराणा सादर करणार आहेत. विविआना मॉल व्यवस्थापनातर्फे ठाणेकरांच्या वीकेण्डची रंगत वाढविण्यासाठी रॉक बॅण्डचे आयोजन करण्यात आले आहे.
कधी : शनिवार सायंकाळी ६.३० ते रात्री ९
कुठे : विविआना मॉल, ठाणे (प)

डोंबिवलीच्या जत्रेत ‘डिजिटल मज्जा’
डोंबिवली-कला संस्कृती यासोबतच ‘डिजिटलायझेशन’चा मेळ घालीत गेल्या वर्षीपासून डोंबिवलीत जत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवार, ५ फेब्रुवारीपासून या जत्रेला सुरुवात होणार असून यंदा प्रथमच वास्तव देखाव्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना बर्फाळ प्रदेश, हिरवीगार झाडी, समुद्र आदी भागांची सफर करता येणार आहे. शिवाय तरुणांसाठी खास आकर्षण असलेला सेल्फी विभागही यंदा प्रथमच जत्रेत असणार आहे. या जत्रेमध्ये कला प्रात्यक्षिके, गायन नृत्य आणि कलात्मकपणे सजवलेले मोठे मत्स्यगृह असे पाहण्याची संधी डोंबिवलीकरांना मिळणार आहे. या जत्रेत ‘डिजिटल सॉफ्टवेअर’ आणि ‘लाइव्ह साऊंडिंग’च्या मिश्रणातून तयार होणारी दृश्य या वेळी पाहता येणार आहे. बच्चेकंपनींसाठी जुन्या पद्धतीच्या जत्रेतील स्टुडिओ सारखा सेल्फी झोन असणार आहे. कलाप्रेमींसाठी जगप्रसिद्ध भारतीय चित्रकारांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन, हस्तकलेच्या वस्तू, आदी गोष्टीही येथे असणार आहेत.
५ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता सुलेखनकार अच्युत पालव, शिल्पकार प्रमोद कांबळे, चित्रकार विजयराज बोधनकर यांची जुगलबंदी सादर करण्यात येणार आहे. त्याच वेळी स्व. सुधीर फडके ते अजय-अतुल हा संगीताचा अनोखा प्रवास सायंकाळी ७ वाजता सादर केला जाणार आहे. तसेच दुपारी ५ वाजता शेफ अमर राणे हे पाककलांचे सादरीकरण करणार आहेत. ६ फेब्रुवारीला सांयकाळी ५ वाजता शेफ कविता पाटील हे पाककलांचे प्रात्याक्षिक दाखविणार आहेत. तर सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत राहुल देशपांडे आणि स्वप्निल बांदोडकर हे आपल्या गोड आवाजात सौम्य सूरतालांचं आणि शास्त्रीय संगीताचे मिश्रण म्हणजेच ‘स्वरा शो’ सादर करणार आहेत. तसेच ज्येष्ठ निसर्गचित्रकार विजय सकपाळ हे जत्रा महोत्सवामध्ये प्रात्यक्षिके दाखविणार आहेत.
७ फेब्रुवारी जत्रेचा शेवटच्या दिवशी तर जत्रेचा जल्लोष पाहावयास मिळणार आहे. दुपारी ५ वाजता शेफ सिद्धार्थ वाधवकर हे विविध प्रकारच्या पदार्थाच्या मेजवान्या सादर करणार आहेत. तसेच आशा भोसले यांच्या व्यक्तिचित्रामुळे जगभर प्रख्यात झालेले प्रमोद कुर्लेकर हे या ठिकाणी आपल्या चित्रांचे प्रदर्शन मांडून प्रात्यक्षिकही दाखवणार आहेत. सायंकाळी ७ वाजता ‘मस्तीभरा है समां’ या शीर्षकाखाली द्वारकानाथ संझगिरी यांच्या संकल्पनेतून मराठी संगीतकारांनी हिंदीत गाजवलेली दादागिरी या विषयावरील गाणी सादर केली जाणार आहेत.
कधी- ५ ते ७ फेब्रुवारी, वेळ- दुपारी ४ ते रात्री १०
कुठे- डोंबिवली जिमखाना, एमआयडीसी, डोंबिवली (पू.)

‘रोमँटिक डेझर्ट्स’
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या प्रियकराला काही तरी खास भेट देण्याचे सर्वच फियान्सीना वाटते. यंदा आपल्या प्रियकरांना त्यांच्या फियान्सीच्या हातचे काही तरी लज्जतदार गोड पदार्थ खाता यावे, यासाठी कोरम मॉलने जय्यत तयारी सुरू केली आहे. खास महिलांसाठी विविध प्रकारचे व्हॅलेंटाइन डे या विषयावर आधारित ‘रोमँटिक डेझर्ट्स’ची कार्यशाळा भरवण्यात येणार आहे. यामध्ये पॅनकेक फ्रुट स्टिक, रोमँटिक शॉफल, पॅनाकोटा लव्हबाईट, बेरी क्रिम बाइट आणि ब्राऊन कबाब यांसारखे जिभेला पाणी आणणाऱ्या पदार्थाच्या मेजवानीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. येत्या बुधवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ८ या वेळेत कोरम मॉल, मंगल पांडे रोड, कॅडबरी कम्पाऊंड जवळ, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाणे (प.) येथे ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. कोरम मॉल तर्फे ‘वुमन्स ऑन वेनस्डे’ हा उपक्रम दर बुधवारी महिलांसाठी खास राबवला जातो.
कधी: बुधवार, १० फेब्रुवारी, वेळ : दुपारी ३ ते रात्री ८
कुठे: कोरम मॉल, मंगल पांडे रोड, कॅडबरी कम्पाऊंड जवळ, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाणे (प.)

ठाणेकरांसाठी महाराष्ट्र महोत्सवाची पर्वणी
लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत आणि ज्येष्ठांपासून ते श्रेष्ठांपर्यंत सर्वाना भुरळ घालणारा ‘महाराष्ट्र महोत्सव’ या शिवसेना घोडबंदर विभाग व वैष्णवी प्रतिष्ठान यांनी सध्या ठाण्यातील आनंद नगर येथे आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये शुक्रवारी शब्दांचा सुरेल प्रवास मांडणारा ‘मी शून्य’ हा कार्यक्रम होणार आहे. कवयित्री रेश्मा कारखानीस आणि गायक केतन पटवर्धन हा कार्यक्रम सादर करणार आहेत. शनिवार, ६ फेब्रुवारी रोजी महिलांसाठी खास ‘हळदीकुंकू पैठणी जिंकू’ आणि फॅशन शोचे आयोजन केले गेले आहे. या वेळी अभिनेत्री गिरिजा जोशी व शिल्पा बहुरूपी उपस्थित राहणार आहेत. रविवार, ७ फेब्रुवारी रोजी ‘बॉलीवूड जलसा’चे आयोजन करण्यात आले आहे.
कधी: ५ ते ७ फेब्रुवारी, वेळ : सायं. ७ ते रात्री १०
कुठे: ठा.म.पा. मैदान, स्वस्तिक रेसिडेन्सी समोर, मुच्छला कॉलेजच्या मागे, आनंद नगर, घोडबंदर रोड, ठाणे (प.)

जयपुरी दागिन्यांचे प्रदर्शन
महिला वर्गाला दागिन्यांचे कायमच आकर्षण राहिले आहे. त्यांची ही हौस पुरविण्यासाठी ठाण्यातील ठाकुरवाडी नेहमीच सज्ज असते. सोने, चांदी, मोती अशा पारंपरिक धातूंबरोबरच प्लॅटिनम, अमेरिकन डायमंड्स, ऑनिक्स, अशा इतर प्रकारांतही दागिने मिळतात. सोन्या-चांदीच्या किमती कितीही चढय़ा असल्या, तरी दागदागिन्यांची हौस अजिबात कमी होत नाही. पारंपरिक भारतीय दागिन्यांमध्ये जयपूर पद्धतीच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे. कुंदनमीनाकाम हे जयपुरी संस्कृतीच्या दागिन्यांचं वैशिष्टय़. लाल-हिरव्या-निळ्या कुदंणांनी सजलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन ठाण्यातील गोखले रोड वरील ठाकुरवाडी येथे भरविण्यात आले आहे.
कधी- दररोज दुपारी १२ ते रात्री ९
कुठे- ठाकुरवाडी, पानेरी साडीच्या समोर, ठाणे (प.)

जुन्या गाण्यांची मैफल
गाणी म्हणजे अंतरंगातील सुख-दु:खांना मोकळं करून देण्याचे एक हक्काचे स्थान असते आणि त्यामुळे मन प्रसन्न होते, म्हणून मुळातच संगीतप्रेमी असणाऱ्या ठाणेकरांसाठी शनिवार, ६ फेब्रुवारी रोजी मराठी गाण्यांची खास मैफल रंगणार आहे. जुन्या गाण्यांमध्ये सप्तसुरातील नाद शरीरात चैतन्य निर्माण करतात. मन, डोळे आणि हृदय यांवर आधारित गाणी सादर होणार आहेत. संगीतात नेहमीच एक धून असते त्यामुळे या कालातीत झालेल्या मराठी गाण्यांचे त्याच चालीत परंतु नवीन आवाजात सादरीकरण करण्यात येणार आहे. रघुलीला एण्टरप्रायझेसतर्फे सादर होणाऱ्या या कार्यक्रमात धनंजय म्हसकर, केतकी भावे-जोशी, हृषिकेश अभ्यंकर, गायत्री शिधये, सुखदा भावे-दाबके, कौस्तुभ दिवेकर, सुशांत बर्वे आदी गायक ‘डोळे हे जुलमी गडे’ यासारख्या गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत.
कधी: शनिवार, ६ फेब्रुवारी, वेळ- सायंकाळी ६.०० वाजता
कुठे: सहयोग मंदिर, घंटाळी पथ, नौपाडा, ठाणे.

‘डीसकार्डेड’ एक अनोखे चित्रप्रदर्शन
प्रख्यात कलाकार युसुफ अरक्कल हे त्यांच्या अलीकडच्या कृष्णधवल चित्रांचे विशेष प्रदर्शन मुंबईतील भुलाभाई देसाई मार्गावरील सिमरोझा कला दालनात ८ ते २० फेब्रुवारीदरम्यान आयोजित करत आहेत. ‘डीसकार्डेड’ नावाच्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ८ फेब्रुवारी रोजी प्राध्यापक पॅट्रीक व्हीटनी, स्टीलकेस/ रॉबर्ट सी प्यू, प्राध्यापक आणि अधिष्ठाता, इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन अ‍ॅट इलीनॉइस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटनाच्या दिवशी अरक्कल यांच्या ‘लायनीयर एक्स्प्रेशन्स’ या नवीन पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. हे पुस्तक पी सुधाकरन यांनी लिहिले आहे.
गेल्या चार दशकांमध्ये अरक्कल यांनी त्यांच्या चित्रांचे विशेष प्रदर्शन देशातील प्रत्येक महत्त्वाच्या शहरांमध्ये भरविले आहे. त्यात मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, कोचीन, कालिकत, त्रिवेंद्रम आणि बेंगळूरू या शहरांचा समावेश आहे. त्यांच्या कलेमध्ये तेल, जलरंग, ग्राफिक आणि कोलाज यांचा समावेश असतो आणि शिवाय कांस्य, टेराकोट्टा, वूड, ग्रॅनाइट, स्टील आणि कागद यांचाही वापर केला जातो. त्याशिवाय, ते १९६९ पासून कित्येक समूह प्रदर्शनांमध्येही सहभागी झाले आहेत. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने कित्येक देशांमध्येही भरविली गेली असून त्यांत रशिया, मेक्सिको, क्युबा, कोरिया आणि जपान यांचा समावेश आहे.
कधी: ८ ते २० फेब्रुवारी (रविवार वगळून)
कुठे: सिमरोझा आर्ट गलरी, ७२, भुलाभाई देसाई रोड, मुंबई

‘बनारस’चे चित्रप्रदर्शन
सुप्रसिद्ध चित्रकार यशवंत शिरवडकर यांचं ‘बनारस’ हे चित्रप्रदर्शन मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन दि. २ ते ८ फेब्रुवारी २०१६ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामूल्य खुलं राहील.
आपल्या कला कारकीर्दीतलं ९४ वं एकल प्रदर्शन मांडणारे चित्रकार यशवंत शिरवडकर ‘बनारस’विषयी खूप आस्था राखून म्हणतात ‘बनारस हे शहर फक्त हिंदूंचेच तीर्थ नाही तर भिन्न तत्त्वज्ञान आणि धारणा असणाऱ्यांसाठीही ते एक प्रेरक स्थान राहिलं आहे. तुलसीदास, शंकराचार्य, महावीर, गौतम बुद्ध यांनी या शहरामध्येच आत्मा ओतला आहे. या शहराचा माहोल आपल्या दर्शकांसमोर मांडणं हे कुठल्याही कलाकाराला आव्हानात्मकच आहे’.
गंगेचं पवित्र जळ, त्यावर सफरीसाठी तयार असणाऱ्या नौका, तिथल्या घाटांवर चालणारी पूजा-अर्चा, उपासना, भव्य मंदिरं, पुरातन संस्कृतीचं प्रतीक असणारी वास्तूकला हे सगळं अचंबित करणारं आहे. हे शहर कधी अवखळ तर कधी धीरगंभीर, कधी रममाण तर कधी अलिप्त, कधी सप्तरंगात न्हाऊन निघालेले तर कधी एकतारीसारखा एकच रंग घेऊन आपल्यातच मग्न असणारं, असं असलं तरी सतत प्रवाही असतं. या शहराचे हे वेगगेगळे आविष्कार शिरवडकर यांच्या चित्रांमधून आपल्याला जाणवत रहातात. इतिहास, परंपरा, श्रद्धा या कलाकाराने सादर केलेल्या कलाकृती सर्वस्पर्शी आहेत.
गेली चाळीसहून अधिक र्वष भारतीय उपखंडाची चित्रंरूपं साकार करणारे चित्रकार शिरवडकर देश-विदेशात विख्यात आहेत. ९३ एकल आणि २१५ समूह प्रदर्शनांमधून आपली कला सादर करणाऱ्या या चित्रकाराने बेल्जियम, नेपाळ, फ्रांस, स्वित्र्झलड, जर्मनी, युरोप, आणि अमेरिका अशा देशांना आपल्या चित्रप्रदर्शनाव्दारे कलेचा आस्वाद दिला आहे. देश आणि विदेशातील चित्रांच्या लिलावात त्यांची चित्रं नेहमीच विकली जातात.
कधी: २ ते ८ फेब्रुवारी, सकाळी ११ ते सायं. ७
कुठे: जहांगीर आर्ट गॅलरी, १६१ ब, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा

पंकज उधास यांच्या ‘लव्ह नोट्स’
प्रख्यात गझलगायक पंकज उधास आपल्या सांगीतिक कारकीर्दीची ३५ वर्षे पूर्ण करत असून ‘लव्ह नोट्स’ या जाहीर कार्यक्रमाच्या माध्यमातून हा टप्पा ते साजरा करत आहेत. हा कार्यक्रम आपल्या प्रियजनांना समर्पित असून तो गुरुवारी ११ फेब्रुवारी २०१६ रोजी वरळी येथील नेहरू सेंटर येथे सायंकाळी ७.३० वाजता पार पडत आहे.
गझलगायक उधास हे चांदी जैसा रंग है तेरा, और आहिस्ता किजीये बातें, सावन के सुहाने मौसम में, जिये तो जिये, न कजरे कि धार, चुपके चुपके आणि त्यांची इतरही अनेक रोमँटिक गाणी ते या कार्यक्रमात गाणार आहेत. ही गाणी थोडय़ाशा वेगळ्या आणि आतापर्यंत न ऐकलेल्या आवाजात असणार आहेत. द इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर यांनी संयुक्तपणे या अत्यंत महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या माध्यमातून भारताचा उंची सांगीतिक वारसा जगभर पसरलेल्या संगीतप्रेमींसमोर ठेवला जाणार आहे.
‘चिठ्ठी आई है’ या १९८६ सालच्या ‘नाम’ चित्रपटातील गाण्याच्या माध्यमातून पंकज उधास हे नावारूपाला आले. देशातील गझल गायन आणि प्रसारातील ते एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आणि स्तंभ आहेत. त्यांनी या संगीत प्रकारामध्ये एक वेगळी शैली दाखल केली आहे. त्या माध्यमातून खरे तर भारतात गझल या संगीत प्रकारालाच नावसंजीवनी मिळाली आहे. गझल संगीत प्रकाराला त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.
‘लव्ह नोट्स’ या कार्यक्रमाला युनियन बँक ऑफ इंडिया, मिनिमक्स आऊटडोअर आणि टाइम्स कार्ड यांचे पाठबळ लाभले आहे.
या कार्यक्रमाची तिकिटे http://www.bookmyshow.com या वेबसाइटवर आणि ५ फेब्रुवारीपासून नेहरू सेंटर आणि हिृदम हाऊस येथे उपलब्ध आहेत.
कधी :११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वा.
कुठे: नेहरू सेंटर, वरळी

मदनमोहन यांची रागदारी
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर संगीतकार मदनमोहन यांना मदनभैय्या म्हणत. मदनमोहन यांनी अत्यंत चिरस्मरणीय अशा रचना केल्या. त्यांना गझलचा सम्राटही म्हटले जात असे. त्यांच्या रचनांमधल्या रागदारीचे मर्म आणि सौंदर्य उलगडून दाखविणारा सप्रात्यक्षिक कार्यक्रम ग्वाल्हेर घराण्याचे गायक/समीक्षक प. अमरेंद्र धनेश्वर शनिवारी सादर करणार आहेत. त्यांना राजन माशेलकर (व्हायोलिन) आणि मुक्ता रास्ते (तबला) साथसंगत करणार आहेत. मोहन जोशी यांचाही कार्यक्रमात सहभाग असणार आहे. सर्व गानरसिकांना हार्दिक निमंत्रण देण्यात आले होते.
कधी: ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० ते ८
कुठे: कलाघर, नंदादीप शाळा, जयप्रकाश नगर, गोरेगाव (पू.)

मुंबईच्या इतिहासाची ‘साक्ष’
सुप्रसिद्ध चित्रकार मुख्तार काझी यांचं ‘साक्ष’ हे चित्रप्रदर्शन मांडण्यात येणार आहे.
चित्रकार मुख्तार काझी यांना कलाकार म्हणून मुंबईने नेहमीच आकर्षति केलं आहे. या शहराची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आणि तोंडवळा हा कुणाही कलाकाराला भुरळ पाडणारा आहे. तसा काझी यांनाही तो सतत खुणावत असतो. भारतीय इतिहास हीच एक महान कलाकृती आहे, इथले राज्यकर्ते, राजे, राज्य आणि साम्राज्य ही काळाच्या ओघात बदलत राहिली, ती आता इतिहासातली नोंद राहिली असली तरी त्यांनी मागे सोडलेल्या खुणा कलाकारांसाठी एक अमूल्य असा ठेवा बनल्या आहेत.
मुंबईच्या पुरातन इमारतींचे देखणेपण, इथे चाललेले मानवी व्यवहार, छत्रपती शिवाजी टर्मिनस, महापालिका इमारत अशा अनेक देखण्या वास्तू, रात्रंदिवस प्रवाही असणारे रस्ते चित्रकार काझी यांनी जिवंत केले आहेत. ही जादुयी नगरी आणि ऐतिहासिक इमारतींचं देखणं रूप यांचं प्रत्ययकारी दर्शन या चित्रांमधून घडतं. मुंबईमधल्या इतिहासकालीन इमारातींचं चित्ररूप दर्शन घेण्याची दुर्मीळ संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून चालून आली आहे, कलारसिकांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा.
कधी: १ ते ७ फेब्रुवारी; सकाळी ११ ते सायंकाळी ७
कुठे: जहांगीर आर्ट गॅलरी, हिरजी गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा