कल्याण – धुळवडीचा आनंद घेत असताना उधळलेले रंग, मौजमजेत गाण्यांच्या तालावर ठेका धरून झाल्यानंतर दुपारच्या वेळेत पोटात पडणारी वखवख भरून काढण्यासाठी भोजनपण झणझणीत पाहिजे. म्हणून शुक्रवारी पहाटेपासून कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांनी सकाळ, दुपारनंतर मटण मिळते की नाही या भीतीने मटण विक्रेत्यांच्या दुकानासमोर रांगा लावल्या होत्या.
अनेक नागरिक धुळवड खेळत असताना घरून स्वयंपाक प्रमुखांच्या आलेल्या निरोपानंतर पिशव्या घेऊन मटण दुकानासमोर रांगेत उभे असल्याचे चित्र दिसत होते. होळीची पुरणाची पोळी खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवडीच्या दिवशी झणझणीत बेत अपेक्षित असतो. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरात मटणांच्या लहान, मोठ्या दुकानांसमोर पहाटेपासून ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. धुळवड, त्यात शुक्रवार. त्यामुळे बहुतांशी घराघरात झणझणीत, गरमाईचा बेत होता. धुळवडीच्या दिवशी मटणाला मिळणारी अधिकची मागणी विचारात घेऊन कल्याण परिसरातील मटण विक्रेत्यांनी अहिल्यानगर, नाशिक भागातून दोन दिवसापूर्वीच शेळ्या, बोकड आणले होते. काहींनी राजस्थान, मध्यप्रदेश भागातून शेळ्या, बोकड, मेंढ्यांची आयात केली होती.
अहिल्यानगर, नाशिक भागातून आणलेल्या शेळ्या, बोकडांच्या मटणाला अधिकची चव असल्याने ग्राहक हे मटण खरेदीला सर्वाधिक पसंती देतो, असे मटण विक्रेत्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, कसारा, आदिवासी पाड्यावरील घरगुती पध्दतीने शेळ्या, कोंबड्या, बोकडांचे पालन करणाऱ्या पशुपालकांनी थेट शेळ्या घेऊन कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरातील मासळी, मटण बाजार याठिकाणी शेळ्या, कोंबड्या, बोकड विक्रीचे सौदे लावले होते. या खरेदीसाठीही गटागटाने नागरिकांची झुंबड होती. मासळी बाजार भागात शेळ्यांची ब्यॅ ब्यॅ आणि कोंबड्यांचा चिवचिवाट होता.
मटण खरेदीसाठी गर्दी वाढली. शुक्रवार, धुळवड आहे म्हणून आम्ही मटणाचे भाव वाढविलेले नाहीत. शेवटी ग्राहक हा नेहमी आमच्याकडेच येणारा असतो. त्यामुळे मटणाला वाढती मागणी आहे म्हणून चढे दर लावा, असे आम्ही करत नाही, असे अनेक मटण विक्रेत्यांनी सांगितले. कल्याण, टिटवाळा, डोंबिवली, ठाकुर्ली, चोळे, मोहने, अटाळी, खडकपाडा, आंबिवली, एमआयडीसी, २७ गाव परिसरातील मटण विक्री दुकानांवर सकाळपासून रांगा होत्या. दुपारनंतर मटणाचा साठा संपल्याने अनेक विक्रेत्यांनी दुकाने बंद केली होती. काहींनी पनवेल भागात जाऊन मटणाची खरेदी केली.
धुळवड, त्यात शुक्रवार त्यामुळे आज मटण दुपारनंतर मिळणार नाही याची माहिती असल्याने शुक्रवारी सकाळी सहा वाजता जाऊन बाजारातून मटण खरेदी केले. दुपारनंतर बहुतांशी मटणाच्या दुकानातील मटण संपले होते. त्यामुळे अनेक ग्राहकांना मटणासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. मनोज वैद्य, रहिवासी, डोंबिवली.
आमच्या दुकानात चवीदार आणि दर्जेदार मटण मिळत असल्याने नेहमीच गर्दी असते. आता धुळवड, शुक्रवार असल्याने मटण खरेदीसाठी ग्राहकांचे प्रमाण अधिक आहे. जुन्या ग्राहकाबरोबर नवीन ग्राहकही आज खरेदीसाठी येतात. ग्राहकांना मागणीप्रमाणे मटण मिळेल अशी व्यवस्था केली आहे. आज मटणाचा भाव ८०० रूपये किलो आहे. अजिम भाई मटण विक्रेता, कल्याण.