ठाणे : शहरातील अतिधोकादायक इमारतींचा वीज, पाणी पुरवठा खंडीत करण्याबरोबरच मलनि:सारण वाहिन्या तत्काळ तोडून टाकण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. इमारत अतिधोकादायक असल्याचे पालिका प्रशासनाने घोषित केल्यानंतरही अशा इमारतींमध्ये नागरिक वास्तव्य करीत असून पावसाळ्यात इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय, स्थिरता प्रमाणपत्र नसलेली तसेच जास्तीचे आकारमान असलेली जाहिरात फलक तत्काळ उतरवा आणि रस्त्यावरील खड्डे भरणे, झाडाच्या फांद्या उचलणे ही कामे २४ तासांत व्हायला पाहिजेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मान्सूनसाठी तयारीच्या दृष्टीने मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याच्या पालकसचिव सुजाता सौनिक यांनी दिलेले निर्देश, तसेच लोकप्रतिनिधी, नागरिकांनी केलेल्या तक्रारी या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व उपनगर अभियंता, सर्व सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता यांची शुक्रवारी बैठक घेतली. महापालिका क्षेत्रात एकूण ९६ अतिधोकादायक इमारती (सी -१ वर्गवारी) आहेत. त्यापैकी, ३७ इमारतीत नागरिक राहत आहेत. त्यात, नौपाडा आणि कोपरी २७, माजिवडा १, उथळसर ३, कळवा २, मुंब्रा ४ अशा इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारतींचा पाणी, वीज खंडीत करण्याबरोबरच मलनिःसारण जोडणी तोडून या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात, असे आदेश आयुक्त राव यांनी दिले.

हेही वाचा – कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याचा बुरूज ढासळला

नागरिकांच्या जिविताचा प्रश्न असल्याने आता चर्चा करण्यात वेळ दवडू नये. नागरिकांची समजूत काढून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. पावसाचा जोर कधीही वाढू शकतो, याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी, असेही आयुक्त राव म्हणाले. पुढील दोन दिवसात सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील अतिधोकादायक (सी -१) आणि धोकादायक (सी २ ए) अशा सर्व इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रहिवाशांना तेथून स्थलांतरित होण्यासाठी संवाद साधावा, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना हलविण्याची वेळ आली तर आपल्या संक्रमण शिबिरामध्ये पाणी, वीज आणि स्वच्छता राखली जाईल, हे पाहावे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. पाणी साठणाऱ्या सखल भागातील १४ मोक्याच्या ठिकाणी ६३ पंप आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच, स्थानिक तरुणांना स्वयंसेवक म्हणून सोबत घ्यावे. त्यांना ओळखपत्र, जॅकेट देण्यात यावे. त्यांच्या मदतीमुळे आपत्कालीन स्थितीत नागरिकांपर्यंत जाणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

खाडीच्या मुखापाशी कचरा साठून ते पाणी नाल्यात पाठीमागे येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी खाडी मुखांपाशी नाल्यांची स्थिती कशी आहे ते पाहून तेथे स्वच्छता करण्यात यावी. गटारांची झाकणे वरचेवर पाहणी करून सुस्थिती राहतील, याची खबरदारी घ्यावी. तसेच, रस्त्यावर साचणारे पाणी पर्जन्यजलवाहिन्यांमध्ये व्यवस्थित वाहून जाईल, तेथे कचरा, माती साचणार नाही, याचीही काळजी घ्यावी, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. नाल्यातील तरंगता कचरा दररोज साफ केला जावा. त्याचप्रमाणे, किती ठिकाणी सफाई झाली याचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

हेही वाचा – घोडबंदर उड्डाणपुलांच्या दुरस्ती कामांना दोन दिवसांत सुरुवात, रात्रीच्या वेळेत कामे करण्यात येणार असली तरी कोंडीची शक्यता

पावसाळ्यात मोठी दुरुस्ती नको

नागरिकांनी पावसाळ्यात घरामध्ये कोणतीही मोठ्या स्वरुपाची दुरुस्ती करू नये. सोसायट्यांनी अशा दुरुस्तीसाठी परवानगी देवू नये. त्याचबरोबर, व्ह्यायब्रेटर सारख्या उपकरणाचा वापर निरीक्षकांच्या देखरेखीत करावा. काही इमारतींच्या दुरुस्तीच्या कामात नियमांची पायमल्ली केली जात असल्याने दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.