scorecardresearch

प्रदूषणमुक्तीसाठी ‘सायकल जागर’; सर्वंकष धोरण आखण्याचे आयुक्तांचे आश्वासन

कल्याण-डोंबिवली शहर परिसरात नागरिकांनी अंतर्गत वाहतुकीसाठी सायकलचा वापर करावा. जे नियमित सायकलचा वापर करतात त्यांना प्रोत्साहन मिळावे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहर परिसरात नागरिकांनी अंतर्गत वाहतुकीसाठी सायकलचा वापर करावा. जे नियमित सायकलचा वापर करतात त्यांना प्रोत्साहन मिळावे. सायकल एक चळवळ बनावी आणि कल्याण, डोंबिवलीतील प्रवास सुसह्य व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत या दोन्ही शहरांमधील सायकल क्लबच्या सदस्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. या सदस्यांच्या सूचना विचारात घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सायकलच्या माध्यमातून प्रदूषणमुक्तीचा जागर व्हावा यासाठी सर्वंकष धोरण आखण्याचे आश्वासन या वेळी आयुक्तांनी संबंधितांना दिले.
या बैठकीस कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, कार्यकारी अभियंता आणि कल्याण सायकल क्लबचे सदस्य प्रशांत भागवत, डोंबिवली सायकल क्लबचे डॉ. सुनील पुणतांबेकर, कल्याण सायकल क्लबचे अद्वैत जाधव, हिरकणी क्लबच्या सुरेखा गटकल, किरण गोरे उपस्थित होते. दोन्ही शहरांमध्ये १२ हून अधिक सायकल क्लब आहेत. महिलांचे स्वतंत्र सायकल क्लब आहेत, अशी माहिती सायकल क्लब पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिली. अंतर्गत रस्ते वाहतुकीवर सायकलाचा रहिवाशांनी वापर केला तर शहरांतर्गत वाहतुकीमधील वाहनांची संख्या कमी होईल. ‘माझे शहर, सुदृढ शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ठरावीक रस्त्यांवर सायकल मार्गिका करणे, शाळांमध्ये सायकल वापराचा जागर करणे असे उपक्रम सायकल क्लबच्या माध्यमातून पालिकेकडून हाती घेतले जातील, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
सायकल क्लबच्या मागण्या
पालिका हद्दीतील नऊ रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळांवर २५ टक्के आरक्षण सायकल उभी करण्यासाठी ठेवले जावे. नोकरदार घरापासून रेल्वे स्थानकात येण्यासाठी सायकलचा वापर करतात. सायकल ठेवण्यासाठी जागा नसल्याने ते गल्लीतील रस्ते, झाडाचा आडोसा घेऊन सायकल उभी करतात. मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर सायकलसाठी स्वतंत्र मार्गिका असावी. सायकलवरून व्यवसाय करणाऱ्यांचा पालिकेने सन्मान करावा. सायकल संमेलन, शहरातील मान्यवरांना सायकल फेरीत सहभागी करून घ्यावे. शाळांमध्ये जागृती अभियान राबवावे. महिला सायकल क्लबच्या माध्यमातून उपक्रम घ्यावेत. स्मार्ट, ई सायकलचा वापर सुरू आहे. तो अधिक प्रभावीपणे अमलता येईल या दृष्टीने पालिकेने सहकार्य करावे, अशा मागण्या सायकल क्लब सदस्यांनी आयुक्तांकडे केल्या.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cycle awareness de pollution assurance commissioner formulate comprehensive policy amy