डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर भागातील ईश्वर रुग्णालयासमोरील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर एका पत्र्याच्या बेकायदा निवाऱ्यात सिध्दी चायनिज सेंटर नावाने एक दुकान चालविले जाते. या दुकानात बुधवारी दुपारी सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन दुकानातील पाच ते सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटानंतर दुकानाला आग लागली.

या आगीत दोन कामगार अत्यवस्थ आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुकानात व्यापारी, घरगुती वापराचे एकूण सहा सिलिंडर होते. त्यामधील एक सिलिंडर फुटला. आगीवर अग्निशमन जवानांनी तातडीने नियंत्रण आणले नसते तर उर्वरित पाच सिलिंडर फुटून परिसरात मोठी नासधूस झाली असती, असे जवानांनी सांगितले. चायनिज केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू असताना हा स्फोट झाला.

हेही वाचा >>>डोंबिवली स्फोटातील आरोपी मलय मेहतासह पत्नीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

सिलिंडरचा स्फोट होताच दत्तनगर परिसर हादरला. या स्फोटात चायनिज सेंटरचे चारही बाजुचे पत्रे, छत स्फोटात उध्दवस्त झाले आहे. स्फोट झाल्यानंतर दुकानाला आग लागली. आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. याठिकाणी इतर पाच सिलिंडर होते. स्फोट होताच रहिवासी घराबाहेर पडले. परिसरातील नागरिकांनी आगीवर पाणी ओतून आग नियंत्रणाचा आणण्याचा प्रयत्न केला. भर वस्तीत हा स्फोट झाल्याने ही आग वाऱ्याच्या वेगाने क्रांतीनगर, इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात पसरून मोठी दुर्घटना घडली असती.

हेही वाचा >>>डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणार्‍या आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करा; अजित पवार गटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

कल्याण डोंबिवली पालिकेचे अग्निशमन जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन बंबांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. दोन्ही गंभीर जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात तर तीन जणांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रामनगर पोलीस ठाणे हद्दीत हा भाग येतो. सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला. ही कामगारांची चूक होती का या दिशेने पोलीस याप्रकरणाचा तपास करणार आहेत.

चायनिजचे पीक

कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीत दुपारी चार ते पहाटे चार वाजेपर्यंत पदपथ, रस्त्यांंवर सिलिंडर लावून चायनिज विक्रेते हातगाडी, पत्र्यांच्या निवाऱ्यामध्ये चायनिज केंद्र चालवितात. अनेक केंद्रांच्या बाजुला चोरून मद्य विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित पोलीस ठाणे हद्दीतील पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री उशिरापर्यंत ही चायनिज केंद्रे सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी या प्रकरणात आपल्या यंत्रणांना कठोर कारवाईचे आदेश देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

वाहतूक कोंडी

सिलिंडर स्फोटाने आग लागताच दत्तनगर परिसरातील वाहने जागीच खोळंबली. त्यामुळे या भागात काही वेळ वाहन कोंडी झाली. मुख्य रस्ता, अंतर्गत गल्ल्या वाहनांनी गजबजून गेल्या. रामनगर पोलीस, डोंबिवली वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही वाहतूक कोंडी सोडवली. रामनगर पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली आहे.