डोंबिवली – येथील ज्येष्ठ कविवर्य, साहित्यिक दिवंगत दत्तात्रेय भास्कर धामणस्कर यांच्या आत्मकथनाचा प्रकाशन सोहळा ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. ‘शब्द नव्याने वाहू लागतील’ या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता डोंबिवली पूर्व येथील सावरकर छेद रस्त्यावरील सीकेपी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
द. भा. धामणस्कर यांनी आपल्या हयातीतच या प्रकाशन सोहळ्याची तारीख निश्चित केली होती. आता त्यांच्या स्मृतींच्या साक्षीत आणि शब्दांच्या सहवासात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्याचे समृध्द वाचक आणि धामणस्कर यांचे स्नेही सुभाष बोरसे आहेत. मौज प्रकाशनचे प्रकाशक श्रीकांत भागवत, मौज प्रकाशनच्या संपादिक मोनिका गजेंद्रगडकर, साहित्यिक आणि कवी डॉ. प्रल्हाद देशपांडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी द. भा. धामणस्कर यांच्या साहित्याविषयी मान्यवरांची मनोगते आणि त्यांच्या निवडक कवितांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात रसिकांसाठी कविवर्य द. भा. धामणस्कर यांचे सर्व प्रकाशित काव्यसंग्रह सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन त्यांचे सुपुत्र अजित धामणस्कर, स्नुषा अनीहा धामणस्कर आणि प्रकाशक श्रीकांत भागवत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
काही दिवसापूर्वी द. भा. धामणस्कर यांचे वृध्दापकाळाने डोंबिवलीत निधन झाले. मागील वर्षभराच्या कालावधीत आपल्या जुन्या आठवणी, जुने दस्तऐवज शोधून आत्मकथनाचे काम द. भा. धामणस्कर यांनी पूर्ण केले होते. या आत्मकथन कार्यक्रमाला कोणाला बोलवायचे, कार्यक्रम कधी करायचा अशी साधारण रूपरेषा द. भा. धामणस्कर यांनी केली होती. दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून ते ठीक होऊन येतील आणि त्यानंतर त्यांच्या आत्मकथन प्रकाशनाचा कार्यक्रम करू असे आयोजकांनी ठरवले होते. पण रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे द. भा. धामणस्कर यांचे चिरंजीव अजित धामणस्कर, स्नुषा अनीहा धामणस्कर आणि मौज प्रकाशनने ‘दभां’ निश्चित केलेल्या तारखेला त्यांच्या आत्मकथनाचे प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवली, मुंबई, ठाणे परिसरातील द. भा. धामणस्कर यांचे चाहते, कवी, साहित्यिक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
