Dahi Handi 2022 Celebration : ठाणे शहराच्या विविध भागातील प्रमुख चौकांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उभारलेल्या दहीहंड्या, या उत्सवाच्या ठिकाणी डिजेच्या तालावर थिरकरणारे गोविंदा पथके, गोविंदा पथकांचा उंच मानवी मनोरे रचण्याचा थरार आणि रस्त्यांवर निघालेले गोविंदा पथकांचे जथ्ये…असे चित्र दिवसभर होते. करोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य शासनाने सण आणि उत्सवावरील निर्बंध हटविले असून यामुळे दोन वर्षानंतर दहीहंडी आयोजकांसह गोविंदा पथके मोठ्या उत्साहात उत्सव साजरे करताना दिसून आले. नौपाडा भागातील मनसेच्या दहीहंडीत कोकणनगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथकाने नऊ थर लावले. गोविंदा पथकांचा हा थराचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केल्याने संपुर्ण शहराला जत्रेचे स्वरुप आले होते.

Dahi Handi 2022 : दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान!

nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
nashik ex soldier fraud marathi news
माजी सैनिकाला कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्यास गोव्यात अटक
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. शहरातील आयोजकांकडून लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात येतात. ही बक्षिसे मिळविण्यासाठी मुंबईतील पथकेही ठाण्यात येतात. त्यामुळे ठाण्याला दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखले जाते. दोन वर्षे करोनामुळे दहीहंडी उत्सवात खंड पडला होता. यंदा मात्र दहीहंडी उत्सव पुर्वीप्रमाणेच मोठ्या उत्साहास साजरा होताना दिसून आला. आनंद दिघे यांची टेंभीनाका मित्र मंडळांने दहीहंडी उभारली असून या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. शिंदे यांचे समर्थक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचे उत्सवाच्या नियोजनात मोठा सहभाग असून ते गुरुवार रात्रीपासूनच याठिकाणी उपस्थित होते. याठिकाणी गोविंदा पथकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. वर्तकनगर भागात आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानने, नौपाड्यातील भगवती शाळेच्या मैदानात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी, जांभळीनाका येथे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टने, रहेजा येथे आमदार रविंद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानने, बाळकुम नाका येथे माजी नगरसेवक संजय भोईर यांच्या साई जलाराम प्रतिष्ठानने, हिरानंदानी मेडोज येथे भाजपचे शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानने दहीहंडी उभारली होती. शहरातील या प्रमुख हंड्या होत्या. याठिकाणी डिजेच्या तालावर गोविंदा पथके थिरकत होती आणि त्यांच्यावर टँकरमधून पाण्याचे फवारे मारले जात होते. मुंबई तसेच ठाण्यातील गोविंदा पथके या सर्वच ठिकाणी हजेरी लावून उंच थर रचत होते. हा थरांचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उत्सवाच्या ठिकाणी सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय, लहान मुलांची खेळणी विकणाऱ्या विक्रेत्यांचे स्टाॅल तसेच खाद्य पदार्थांचे स्टाॅल लावण्यात आले होते. या उत्सवाच्या निमित्ताने शहराला जत्रेचे रुप आले होते.

वाहतूक बदल आणि पथकांचे जथ्थे –

ठाणे पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर शहरातील वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल लागू करण्यात आले होते. शहरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. तसेच गोविंदा पथकांच्या वाहनांनाही शहरातील अंतर्गत मार्गावर येण्यास प्रवेश बंदी लागू केली होती. गोविंदा पथकांची वाहने पूर्व द्रुतगती मार्गाच्या सेवा रस्त्यावर उभी करण्यात येत होती. त्यामुळे टेंभीनाका, जांभ‌ळीनाका, नौपाडा, वर्तकनगर या भागात गोविंदा पथके पायी निघाली होती. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी गोविंदा पथकांचे जथे दिसून आले. यामुळे अंतर्गत वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन काही ठिकाणी कोंडी झाल्याचे दिसून आले.

सुरक्षेसाठी सेफ्टी रोप –

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी गोविंदांसाठी सुरक्षेच्या उपाययोजना कऱण्यात आल्याचे दिसून आले. गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी रोप लावण्यात आला होता. याशिवाय, जखमी गोविंदांच्या उपचारासाठी आरोग्य पथकांसह रुग्णवाहीकांची व्यवस्था ठेवण्यात आली होती.