दहीहंडी उत्सवात न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन; रस्ते अडवून, डीजेच्या दणदणाटात उत्सव साजरा
रस्त्यावर अडवणूक, वाहतूक नियमांचे उल्लंघन, चार थरांपेक्षा अधिक थर आणि डीजेचा दणदणाट.. वसई-विरारमध्ये कायदा आणि न्यायालयीन नियमांचे उल्लंघन करत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. न्यायालयाचे आदेश अक्षरश: पायदळी तुडवण्यात आले होते. २० फुटांपेक्षा अधिक उंचावर दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या, तर चारपेक्षा अधिक थर तर सर्वत्रच दिसत होते. दहीहंडी फोडण्यासाठी लहान मुलांचा वापर तर सर्रास करण्यात आला. ज्या ठिकाणी दहीहंडी उंचावर नव्हती, त्या ठिकाणी अधिकाधिक थर लावून सलामी देण्यात आली.
यंदा सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवासाठी अनेक र्निबध घातले होते. त्यात १८ वर्षांखालील मुलांना बंदी तसेच २० फुटांपेक्षा अधिक म्हणजे चार थरांपेक्षा अधिक थर नसावेत, अशा सक्त सूचना होत्या. वसई-विरार शहरात १६७ सार्वजनिक दहीहंडय़ा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र त्यापैकी अनेकांनी नियमांचे पालन केले नसल्याचे दिसून आले. विरारमध्ये चंदनसार येथे रस्ता अडवून दहीहंडी बांधण्यात आली होती, तर जेपी रोड येथेही हाच प्रकार होता. अनेकांच्या दहीहंडय़ा या चार थरांपेक्षा अधिक होत्या, तर सलामीच्या नावाखाली उंचच उंच मनोरे रचून एक प्रकारे न्यायालयाचा अवमान केला जात होता.
वाहतुकीस अडथळा
वसई-विरारमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावरच दहीहंडी बांधण्यात आली होती. अनेक ठिकाणी प्रमुख नाक्यांवर, चौकात दहीहंडी उभारण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. अनेक गोविंदा पथकांच्या गाडय़ा आणि दुचाकी यांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. शहरातील चौकाचौकांत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या डोळ्यांदेखत काही गोविंदा विनाहेल्मेट प्रवास करीत होते. तसेच काही गोविंदांची टवाळखोरी सुरू होती.
आयोजनात झगमगाट
न्यायालायचे र्निबध असले तरी सार्वजनिक दहीहंडीच्या आयोजनात झगमगाट दिसून आला. लाखो रुपयांच्या रकमांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी डीजे आणि ऑर्केस्ट्रा लावण्यात आला होता, तर मराठी सिनेसृष्टीतील कलावंतांना पाचारण करण्यात आले होते.
चित्रण पाहून कारवाई करणार
वसई पोलिसांनी प्रत्येक दहीहंडी उत्सवावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आम्ही या उत्सवाचे व्हिडीओ चित्रण करत असून ते पाहून कुणी नियमांचं उल्लंघन केले आहे का ते तपासले जाईल आणि मग कारवाई केली जाईल, असे वसई पोलिसांनी सांगितले.
मीरा-भाईंदरमध्ये न्यायालयाच्या आदेशांचे पालन
न्यायालयाने दहीहंडीची उंची वीस फुटांपर्यंतच ठेवण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मीरा-भाईंदर शहरात ठिकठिकाणी न्यायालयाच्या आदेशांचे पालन होता दिसून आले. काही ठिकाणी २५ ते ३० फुटांच्यावर दहीहंडीची उंची बांधण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात हंडी फोडताना ती वीस फुटांच्या मर्यादेत आणून न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
इतर शहरांच्या तुलनेत मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडी उत्सवाचा जोर दिसून आला नाही. राजकीय पक्षांच्या ठरावीक हंडय़ा वगळता इतर ठिकाणी फारसा उत्साह दिसत नव्हता. यंदाही शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच भारतीय जनता पक्षातर्फे दहीहंडय़ा आयोजित करण्यात आल्या होत्या. दहीहंडीच्या उंचीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांवर मनसेने जाहीर केलेल्या भूमिकेने मनसे नेमकी किती उंचीवर हंडी बांधते याबाबत विशेष उत्सुकता होती. मनसेतर्फे मीरा-भाईंदरमध्ये गोल्डन नेस्ट, रामदेव पार्क या ठिकाणी हंडी बांधण्यात आली होती. मात्र या हंडीची उंची तीस फुटांपेक्षा जास्त दिसून आली नाही. ही दहीहंडी प्रत्यक्षात फोडताना जमिनीवर आणण्यात येईल, मात्र त्याचबरोबर निषेध व्यक्त करण्यासाठी जमिनीवर आडवे नऊ थर लावणार असल्याचे मनसेचे सुल्तान पटेल यांनी सांगितले.
न्यायालयाच्या आदेशांचा आम्हाला आदर आहे, परंतु संस्कृतीची जोपासना आम्ही करणार, आम्ही हंडी बांधण्याचे काम केले आहे, आता किती थर लावायचे हे गोविंदा पथकाने ठरवायचे आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते अरुण कदम यांनी दिली. शिवसनेतर्फे उपमहापौर प्रवीण पाटील यांनी आयोजित केलेल्या दही हंडीतही सलामी देणाऱ्या पथकांना चारपेक्षा जास्त थर लावण्यास मनाई करण्यात आली होती; परंतु त्याचबरोबर काळे झेंडे दाखवत या वेळी गोविंदांनी निर्णयाचा निषेधही व्यक्त केला. सायंकाळी उशिरापर्यंत बऱ्याच ठिकाणच्या हंडय़ा फुटलेल्या नव्हत्या.
न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत आहे की नाही यावर पोलिसांचे लक्ष असून यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली. ही पथके चित्रीकरण करण्यासोबतच आवाजाची पातळी मोजण्याचेदेखील काम करत असून अद्याप शहरात कोठेही नियमांचे उल्लंघन झाले नाही.
– नरसिंह भोसले, पोलीस उपअधीक्षक
