scorecardresearch

कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांचे झिंगाट गाण्यावर नृत्य ; नगरविकास प्रधान सचिवांकडे तक्रार

कल्याण डोंबिवली पालिकेचा ३९ वर्षा वर्धापनदिन सोहळा शनिवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता.

कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांचे झिंगाट गाण्यावर नृत्य ; नगरविकास प्रधान सचिवांकडे तक्रार
कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांचे झिंगाट गाण्यावर नृत्य

कल्याण डोंबिवली पालिकेचा ३९ वर्षा वर्धापनदिन सोहळा शनिवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी बसविलेली गाणी, नृत्य मंचावर सादर केली जात होती. अशाच एका झिंगाट गाण्यावर कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी फेर धरत नृत्य केल्याने खळबळ उडाली आहे. समाज माध्यमावर या नृत्याची दृश्यचित्रफित तुफान प्रसारित झाली आहे.आयुक्तांच्या या नृत्यावरुन पहिले कल्याण डोंबिवलीतील रस्ते सुस्थितीत करा, विकास कामे मार्गी लावा, कचरा हटवा, शहरे प्लास्टिक मुक्त करा मग त्या रस्त्यांवर फेर धरणारी नृत्ये सादर करा अशी टीका आयुक्त आणि समपदस्थ अधिकाऱ्यांवर समाज माध्यमांमधून सुरू आहे.

हेही वाचा >>> ठाणे : बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्यांना अटक ; काॅलसेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणुक

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी कसे वावरावे याची शासकीय संहिता आहे. अशा संहितेमध्ये प्रशासनाचा प्रमुख आयुक्तांने कोठेही गैरवर्तणूक आणि प्रशासन टिकेला बळी पडेल अशी कृती करण्यास मज्जाव आहे. अशाही परिस्थितीत आयुक्तांनी अत्रे रंगमंदिराच्या मंचकावर महिला, पुरुष पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात नृत्य केल्याने खळबळ उडाली आहे.अशाच प्रकारचे नृत्य यापूर्वी माजी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कल्याण मधील वसंत व्हॅली येथील सार्वजनिक रस्त्यावर केल्याने ते टिकेचे लक्ष्य झाले होते. तीच कृती आता आयुक्त दांगडे यांनी केल्याने त्यांना सल्ला देणारे पालिकेतील अधिकारी कायम असल्याने मागची चूक या आयुक्तांनी केल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

प्रशासनाचा प्रमुख म्हणून आयुक्तांनी सेवा वर्तवणूक नियमांचा भंग केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आणि थेट भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय. ए.एस.) सेवेतील आयुक्त कल्याण डोंबिवली पालिकेला देण्याची मागणी या जागरुक नागरिकाने नगरविकास प्रधान सचिव सोनीया सेठी यांच्याकडे केली आहे.गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीतील खड्डे, रस्त्यांची दुर्दशा, फेरीवाल्यांचा विळखा, वाढत्या टपऱ्या, स्मार्ट सिटी विषयांवर आयुक्त दांगडे यांना फैलावार घेतले आहे. त्यामुळे आपल्या अधिपत्याखालील अधिकाऱ्यांना कामाला लावून रस्ते, खड्डे विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आयुक्त दांगडे मनोरंजनाच्या पोरकट कार्यक्रमात सहभागी होत असल्याने डोंबिवली, कल्याण मधील विविध क्षेत्रातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> ठाणे : बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्यांना अटक ; काॅलसेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणुक

डोंबिवलीतील शिवसेनेच्या बड्या नेत्याने आयुक्तांच्या कृत्याविषयी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, नगरविकास प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. आपले पत्र सोमवारी या अधिकाऱ्यांकडे पोहचलेले असेल असे या नेत्याने सांगितले. प्रशासन प्रमुख म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेवर कोणाचाही वचक राहिलेला नाही अशी टीका गेल्या आठवड्यात मंत्री चव्हाण यांनी केली होती. आयुक्त दांगडे यांच्या संथगती आणि भविष्येवेध नसलेल्या कामांविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही दिग्गजांनी तक्रारी केल्या आहेत. हा विषय फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कानावर घातला असल्याचे समजते. आयुक्त दांगडे यांना आपण काही दिवस संधी देऊ त्यानंतर त्यांचे काय करायचे बघू, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस यांना सांगितले असल्याचे समजते.

मुख्यमंत्री गटातील एक नेता आयुक्त दांगडे यांची पाठराखण करत असल्याने ते संथगती काम करत असल्याचे भाजप, मनसे आमदारांचे मत आहे.
बाजुच्या नवी मुंबई पालिकेचे आयुक्त देशातील सर्वात स्वच्छ महापालिका म्हणून केंद्र शासनाकडून पुरस्कार घेतात आणि आमचे कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त पाहा कसे नृत्य करत आहेत. – प्रमोद पाटील , आमदार ,मनसे

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या