जलशुद्धीकरण यंत्रणेलाच धोका

गेल्या आठवडय़ाभरापासून उल्हास नदीच्या पाण्यावर येत असलेल्या तांबडय़ा तवंगामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच या तवंगाचा फटका जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्राला बसू लागला आहे.

उल्हास नदीवरील तवंगामुळे यंत्रणेत बिघाडाची भीती

अंबरनाथ : गेल्या आठवडय़ाभरापासून उल्हास नदीच्या पाण्यावर येत असलेल्या तांबडय़ा तवंगामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच या तवंगाचा फटका जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्राला बसू लागला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या या केंद्रातून जिल्ह्यातील प्रमुख शहरांतील ४५ लाखांहून अधिक लोकसंख्येला पाणीपुरवठा होतो. मात्र नदीच्या पाण्यावरील चिकट तवंग आत शिरल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून अनेकदा येथील यंत्रणा बिघडत आहे.

हा तवंग असाच येत राहिल्यास शहरांचा पाणीपुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच याचा पाणीपुरवठा होत असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे, मीरा-भाईंदर, पनवेल, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या पालिका क्षेत्रांसह कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्यावर गेल्या काही दिवसांपासून तांबडय़ा रंगाचा तवंग दिसू लागला आहे. उल्हास नदी  बचाव कृती समितीच्या सदस्यांनी तक्रार केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने संकलित केले आहेत. मात्र आठवडाभरापासून सुरू असलेल्या या प्रकाराचा फटका आता जलशुद्धीकरण केंद्राला बसू लागला आहे.

 जांभूळ येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. बारवी धरणातून सोडलेले पाणी आपटीजवळ उल्हास नदीला येऊन मिळते. आपटी येथे असलेल्या बंधाऱ्यातून पाणी उचलून ते जांभूळ येथे प्रक्रियेसाठी आणले जाते. यावर प्रक्रिया करून दररोज सुमारे ७०० ते ७५० दशलक्ष लिटर पाणी पुढे तीन जलवाहिन्यांमधून सोडले जाते. उल्हास नदीच्या पाण्यावरील तांबडा तवंग चिकट असून तो पाण्यासोबत जलशुद्धीकरण यंत्रणेत शिरल्यानंतर यंत्रणेत बिघाड होऊन ती ठप्प होते. हा तवंग प्रक्रिया केंद्रात जाण्यापूर्वी काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे एमआयडीसी सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, या प्रक्रियेत वेळ खर्च होत आहे. तवंग शिरून सातत्याने जलशुद्धीकरण केंद्र बंद पडले तर त्याचा फटका थेट शहरांना होणाऱ्या पाणीपुरवठय़ाला बसण्याची भीती व्यक्त होते आहे. पाण्याच्या चिकटपणामुळे शुद्धीकरणाची यंत्रणा बिघडण्याची भीती काही अभियंत्यांनी व्यक्त केली आहे. ही यंत्रणा बिघडल्यास त्याचा फटका ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या सर्व महापालिकांसह अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे टीटीसी, वागळे इस्टेट, पनवेल या औद्योगिक वसाहतींनाही बसू शकतो. त्यामुळे तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त होते आहे.

दर शुक्रवारी नदीत रसायने?

ज्या वेळी शुक्रवारी औद्योगिक क्षेत्र आणि जलशुद्धीकरण केंद्र बंद असते त्या वेळी नदीपात्रात रसायने सोडल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आठवडाभरापूर्वी पाणी बंद असताना हा चिकट पदार्थ नदीत सोडल्याची शक्यता बळावली आहे. हा पदार्थ वाहनांमध्ये वंगण म्हणून वापरल्या जाणाऱ्या ग्रीससारखा जाणवत असून त्याचा वासही तसाच येत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Danger water purification system itself ysh

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद
ताज्या बातम्या