शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात मुलाचा उल्लेख केल्याने मुक्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे दुखावले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपला संताप आणि भावना व्यक्त केल्या आहेत. “ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहाते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही?,” अशी विचारणा श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. फेसबुकला त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाला लक्ष्य केलं. “बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या,” असा उल्लेख उद्धव यांनी आपल्या भाषणात केला. यानंतर शिंदे कुटुंबाकडून नाराजी व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे यांनीदेखील आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उत्तर दिलं.

श्रीकांत शिंदेंनी पत्रात काय म्हटलं आहे?

“महाराष्ट्रानं जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित मनानं आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. हे पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘खासदार मुला’चं नाही; हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या दीड वर्षाच्या निरागस, चिमुकल्याच्या ‘बापा’चं. माझं हे पत्र तुम्ही नीट, सहृदयतेनं पूर्णपणे वाचावं,” अशी विनंती श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

“काल आमचा – शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात दणक्यात झाला. तुम्हीही तुमचा मेळावा शिवाजी पार्कमध्ये घेतलात. आपापल्या राजकीय भूमिका मांडणं, प्रतिस्पर्ध्यावर टीका करणं हे राजकारणात होणारच. त्यावर माझा आक्षेप नाहीच. तुम्ही तुमच्या मेळाव्याची जाहिरात काय केली होतीत? धगधगत्या हिंदुत्वाचे विचार ऐका वगैरे. कालच्या सभेत तुम्ही हिंदुत्वाचे काय विचार ऐकवलेत ते फक्त तुम्हालाच ठाऊक. मला तुम्हाला फक्त इतकंच विचारायचं आहे की, एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का?,” अशी विचारणा श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

‘अवघ्या दीड वर्षाच्या नातवालाही नाही सोडलं’, उद्धव ठाकरेंच्या टीकेने एकनाथ शिंदे व्यथित, संताप व्यक्त करत म्हणाले “ज्या दिवशी…”

“उद्धवजी, तुम्हाला आठवतंय का तुम्ही काल काय बोललात ते? उद्धवजी तुम्हाला आठवतंय का माझ्या मुलाचा – रुद्रांशचा उल्लेख तुम्ही कसा केलात ते? माझा उल्लेख तुम्ही ‘कार्टं’ असा केलात. चला, ठीक आहे, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही बोललात म्हणून सोडून दिलं आम्ही. पण तुम्ही हद्दच केलीच. माझ्या रुद्रांशचा उल्लेख करून, ‘त्याचा नगरसेवकपदावर डोळा आहे’ असं वक्तव्य केलंत तुम्ही. उद्धवजी, ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? मुख्यमंत्री असताना स्वतःला ‘कुटुंबप्रमुख’ म्हणवत होतात ना? मग कुटुंबप्रमुख असा कोवळ्या जिवांचा बाजार मांडणारा असतो? उद्धवजी, कुठे आदरणीय, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कुठे तुम्ही. आदरणीय बाळासाहेबही विरोधकांवर जळजळीत टीका करायचे, पण त्यांनी असली हीन व गलिच्छ टिप्पणी कधीही केली नाही,” अशी आठवण त्यांनी करुन दिली आहे.

“उद्धवजी, माझे वडील राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मी खासदार आहे; पण आम्ही शेवटी रक्तामांसाची, भावभावना असलेली माणसंच आहोत हो. तुम्हाला कल्पना आहे का, कालच्या तुमच्या वक्तव्यानं आमच्या कुटुंबातील लोकांना किती धक्का बसला आहे तो? खरं तर हे खूपच खासगी पातळीवरचं आहे, पण ते सांगणं मला भाग पडत आहे. तुम्ही काल जे बोललात ते ऐकून बाळाची आई व आजी दोघी कमालीच्या दुखावल्या. धास्तावल्यात. त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले,” असं श्रीकांत शिंदेंनी सांगितलं आहे.

Dasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी? मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी

“ज्या चिमुकल्याचं दुडूदुडू चालणं, त्याचं बोबडं बोलणं, हसणं-खिदळणं हे देवाचं देणं आहे अशी आपली श्रद्धा आहे, त्याच्याविषयी एक राजकारणी माणूस असं कसं काय बोलू शकतो, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे आणि त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. तुमच्याकडे आहे? एका माजी मुख्यमंत्र्याच्या तोंडी ही असली भाषा? अहो, पद वगैरे जाऊ द्या. कुठलाही सुसंस्कृत माणूस, संवेदनशील माणूस असं बोलू शकतो? बोलणं सोडाच, असा विचार करू शकतो? मनाला किती वेदना देणारं आहे हे उद्धवजी. आणि या पत्रात जी वेदना मी मांडली आहे तीच भावना राज्यातील प्रत्येक बापाची असणार यात मला तरी शंका नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणालेत की “ज्या परिवारासाठी आम्ही जीवाचं रान केलं. त्याच कुटुंबातली एक प्रमुख व्यक्ती ज़र आमच्या चिमुकल्याबद्दल असे उद्गार काढत असेल तर आमच्या मनाला किती वेदना होत असतील. तुम्ही तुमची पातळी सोडलेली असली तरी आम्ही सोडलेली नाही आणि सोडणारही नाही. म्हणूनच एक सांगतो. उद्धवजी, तुम्हीही पुढच्या काळात आजोबा व्हाल. तुमच्या लाडक्या नातवाचं, नातीचं कौतुक कराल. त्यांच्या डोळ्यांतील निरागसता पाहून तुमचंही मन आनंदानं भरून जाईल. कल्पना करा उद्धवजी, त्या तुमच्या नातवाबद्दल, नातीबद्दल तुम्ही जे काल बोललात तसं कुणी बोललं तर काय अवस्था होईल तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची. देव करो नि तसं त्यांच्याबद्दल कुणीही न बोलो, ही माझी- एका बापाची – मनापासूनची सदिच्छा आहे”.

“एकच लक्षात ठेवा, पोटच्या बाळावर जिवापाड माया करणाऱ्या आईचा शाप सगळ्यांत धारधार असतो, आणि बाळासाठी वाट्टेल ते करणाऱ्या हिरकणीचा हा महाराष्ट्र आहे. त्या हिरकणीचा अंश अजूनही सगळीकडे आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

“भगवद्गीतेत एक श्लोक आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥ हा श्लोक तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल अशी आशा करतो. हा श्लोक वाचून एक प्रश्न मनात येतो तो तुम्हाला विचारतो. माझ्या बाळाचा जन्म आणि हा श्लोक यांत काही नातं असेल का हो? उद्धवजी, काळ लक्षात घ्या, श्लोकाचा अर्थ लक्षात घ्या. वेळ निघून चालली आहे. वेळेसोबतच बरच काही निघून चाललंय तुमच्या हातातून. त्याचा विचार करा,” असा सल्ला त्यांनी दिला आहे.

“पत्राच्या शेवटी एका बापाची हात जोडून, डोळ्यांत पाणी आणून विनंती. राजकारण होतच राहील हो… टीका टिप्पणी होतच राहील. पण त्यात निरागसतेला ओढू नका हो. पाप आहे हे. आणि तेही कुठेही फेडता येणार नाही असं. त्या पापाचे धनी होऊ नका,” असं ते म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेही व्यथित

एकनाथ शिंदे बीकेसीमधील दसरा मेळाव्यात भाषणासाठी उभे राहिले असता, त्यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेची माहिती चिठ्ठीच्या माध्यमातून दिली जात होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुलगा आणि नातवावर टीका केल्याचं समजताच त्यांचा संताप अनावर झाल्याचं समजत आहे.

“माझा नातू दीड वर्षाचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करताय त्या दीड वर्षाच्या बाळावर. कोणत्या पातळीवर पोहोचला आहात? पायाखालची वाळू सरकली ना. तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काही बोललो का? लाज तुम्हाला वाटायला हवी होती. बाळासाहेबांच्या विचारांना तोडून मोडून तुम्ही सत्ता मिळवली. छातीवर दगड ठेवून मी तुमच्यासोबत राहिलो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती,” असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dasara melava 2022 shinde faction mp shrikant shinde letter to shivsena uddhav thackeray over son sgy
First published on: 06-10-2022 at 17:28 IST