खड्ड्यांमुळे शहराच्या विविध भागात वाहतूक कोंडी होऊन प्रवाशां बरोबर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शालेय बस या वाहन कोंडीत अडकत असल्याच्या तक्रारी पालिककडे वाढल्याने, शहरातील सर्व मुख्य, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे पाऊस सुरू असेपर्यंत खडी, माती टाकून बुजविण्याचे काम पालिकेच्या रस्ते बांधकाम विभागाने सुरू केले आहे.

काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पालिकेने गेल्या महिन्यात माती, खडी, सिमेंटने बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहने संथगतीेने चालविली जात असल्याने डोंबिवली, कल्याण मध्ये मानपाडा रस्ता, टिळक रस्ता, घरडा सर्कल, कल्याण पूर्व भागात चिंचपाडा रस्ता, पुना लिंक रस्ता भागात वाहतूक कोंडी होते.

डोंबिवलीत घरडा सर्कलमार्गे शहरात येणाऱ्या वाहन चालकांना शिवम रुग्णालय, शेलार नाका, मंजुनाथ शाळा ते टिळक पुतळा रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहने संथगतीने चालवावी लागतात. शहराच्या प्रवेशद्वारावरील रस्त्यावर वाहन कोंडी होत असल्याने शहरा बाहेरुन येणारे प्रवासी संतप्त होत होते. मानपाडा रस्त्यावरील सागाव ते डी मार्ट पर्यंतचे खड्डे पाहून अनेक वाहन चालक घरडा सर्कल मार्गे शहरात येतात. त्यांना घरडा सर्कल येथेही खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.

खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी वाहतूक पोलीस, वाहतूक सेवकांना एका ठेकेदाराला हाताशी धरुन खडी उपलब्ध करुन दिली. वाहतूक पोलिसांनी गुरुवारी डोंबिवलीतील टिळक पुतळा ते घरडा सर्कल दरम्यानचे खड्डे बुजवून टाकले. खडी टाकल्यामुळे किमान वाहतूक कोंडी होणार नाही या उद्देशाने खड्डे बुजविण्याची कामे केली, असे पोलीस निरीक्षक गित्ते यांनी सांगितले.

खड्डे भरणी सुरू
डोंबिवलीतील मुख्य रस्त्यावरील खड्डे भरणीची कामे दिवस-रात्र काम करुन भरण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. गुरुवारी रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत डोंबिवली पूर्व भागातील टिळक चौक ते घरडा सर्कल, ठाकुर्ली चोळेगावातील हनुमान मंदिर ते ९० फुटी रस्ता, मंगल कलश सोसायटी रस्त्यांवरील खड्डे, ई प्रभागातील वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे पूर्ण केली आहेत, असे डोंबिवली बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितले.

डोंबिवली शहराच्या सर्व मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे प्राधान्याने भरुन घेण्यात येत आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे नियोजन केले आहे. त्यानंतर अंतर्गत रस्त्यांवरील कामे पुन्हा सुरू केली जाणार आहेत. पावसाने उघडीप दिली की डांबर मिश्रित खडी खड्ड्यांमध्ये भरण्याची कामे केली जाणार आहेत. गणेशोत्सवापूर्वी डांबर मिश्रित खडी टाकून खड्डे बुजविण्याचे नियोजन आहे, असे कार्यकारी अभियंता लोकरे यांनी सांगितले.

शहर अभियंता विभागाने पावसाळा पूर्वीचे खड्डे भरण्याची कामे मे-जून अखेरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. या कालावधीत शहर अभियंता विभाग सुस्त राहिला. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर खड्डे भरणे कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू केल्या. या प्रक्रियेत वेळकाढूपणा झाल्याने दरम्यानच्या काळात शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले. त्याचा त्रास आता प्रवाशांना सहन करावा लागतो. पावसाळापूर्वी आणि नंतर खड्डे भरणीची कामे करण्यासाठी १५ कोटीची तरतूद आहे.

डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे दिवस, रात्र सुरू ठेवण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. वाहन कोंडी टाळण्यासाठी हे नियोजन आहे. पावसाने उघडीप दिली की हे खड्डे डांबर मिश्रित खडीने भरण्यात येणार आहेत. – रोहिणी लोकरे , कार्यकारी अभियंता ,डोंबिवली