ठाणे : राज्यात सार्वजनिक ठिकाणचा वीजपुरवठा सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या तोंडी सूचनांची शुक्रवारपासून वीज कंपन्यांनी अंमलबजावणी सुरू केली. अनावश्यक वीजेचा वापर टाळण्यासाठी दिवसा पथदिवे बंदीच्या निर्णयाचे स्वागत होत असले तरी, वरवर चांगल्या वाटणाऱ्या या निर्णयाचा फटका ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांना बसल्याचे चित्र दिसून आले. या निर्णयामुळे पथदिव्यांसह वाहतूक सिग्नल यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याबरोबरच पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामेही खोळंबल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची कोंडी झाली.

विशेष म्हणजे, या निर्णयाबाबत लेखी आदेश नसून तोंडी सूचनांच्या आधारे अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरम्यान, तक्रारीनंतर महावितरणने सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेतली. अनेकदा रस्त्यांवरील पथदिवे दिवसाही सुरू असतात. हा वीजेचा अनावश्यक वापर रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणचा वीजपुरवठा सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेऊन तशा तोंडी सुचना वीज कंपन्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी करताना पथदिव्यांसोबतच इतर महत्त्वाच्या यंत्रणांचाही वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील वाहतूक नियंत्रित करणारे सिग्नल आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेसह वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली.

वीजपुरवठा बंद झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतील पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामेही ठप्प झाली. सकाळच्या वेळेत केली जाणारी ही कामे खोळंबल्याने संबंधित ठेकेदारांसमोर अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान, महापालिकांनी वीजदेयके वेळेत भरलेली नसल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची चर्चा शहरात पसरली. त्यामुळे सुरुवातीला गोंधळलेल्या पालिका अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, सार्वजनिक ठिकाणी दिवसा अनावश्यक होणारा वीज वापर रोखण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत अधिकाऱ्यांची धावपळ

ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील विविध शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने स्थानिक प्रशासनाचा गोंधळ उडाला. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणांचा वीजपुरवठा बंद झाल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. संबंधित यंत्रणांचे वीजमीटर क्रमांक मागवून त्यांचा पुरवठा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. वीजपुरवठा बंद राहिल्याने महापालिकेची अनेक कामे खोळंबत असल्याचे निदर्शनास आणून देत, पूर्वीप्रमाणेच वीजपुरवठा सुरू ठेवण्याची विनंती महावितरणला केल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ठाण्यातील तीन हात नाका हा वर्दळीचा परिसर असून, तेथील वाहतूक सिग्नल यंत्रणाही काही काळ बंद पडली होती. मात्र, काही वेळानंतर ही यंत्रणा पुन्हा सुरू झाल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

तक्रारीनंतर सिग्नल, सिसीटिव्ही वगळले

तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सिग्नल आणि सीसीटीव्ही या सारख्या अत्यावश्यक यंत्रणा सुरू ठेवण्याचा निर्णय वीज कंपन्यांनी घेतला असून त्यानी या यंत्रणांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली. इतर महत्त्वाच्या व्यवस्थांवरही या निर्णयाचा परिणाम होत असल्याचे आढळल्यास त्यांनाही या निर्बंधांतून वगळण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

अनेकदा रस्त्यांवरील पथदिवे दिवसा सुरू असतात. विजेचा अनावश्यक वापर रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणचा वीजपुरवठा सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याच्या सूचना कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर सिग्नल यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर या यंत्रणांना निर्णयातून वगळून त्यांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. या निर्णयामुळे अन्य महत्त्वाच्या व्यवस्थांवर परिणाम होत असल्याचे आढळल्यास त्यांनाही यातून वगळण्यात येईल, ठाणे महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली.