मुरबाड तालुक्यातील सरळगावाजवळ कोरावळे हद्दीत एका बिबट्याचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. याची माहिती मिळताच वन विभागाच्या मदतीने बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा पशू वैद्यकीय विभागाकडे पाठवण्यात आला. या बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. शारिरीक कारणामुळे शिकार करण्यास असमर्थ ठरल्याने उपासमार होऊनही हा बिबट्या मृत्यूमुखी पडल्याचे बोलले जाते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पूर्व द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या कोंडीतून ठाणेकरांची सुटका; नव्या कोपरी पूलाचे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्याच्या वेशीवर अनेकदा बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू असतो. अहमदनगर जिल्ह्यातून गेल्या वर्षात एक बिबट्या लांबलचक प्रवास करून थेट कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यापर्यंत येऊन पोहोचला होता. रेडिओ कॉलर असल्याने या बिबट्याचा फिरतीचा मार्ग कळत होता. या बिबट्याने अनेक पाळीव जनावरांना आपले भक्ष्य केले होते. या बिबट्याने थेट शहरांच्या प्रवेशद्वारापर्यंत मजल मारली. मात्र कालांतराने तो पुन्हा आपल्या मुळ अधिवासात गेला होता. त्यानंतर अधूमधून बिबट्याच्या मुक्त संचाराची माहिती मिळत होती. काही दिवसांपूर्वी बदलापुरजवळ बिबट्या पाहिला गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता मुरबाड तालुक्यातील सरळगावजवळच्या कोरावळे गावाच्या हद्दीत एका बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली कुंभारखाण पाड्यातील हरितपट्ट्यातील बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्याचे आयुक्तांचे आदेश

बुधवारी सकाळी वन विभागाला कोरावळे हद्दीत लघु पाटबंधारे विभागाच्या ओढ्याजवळच्या मोकळ्या जागेत मृत अवस्थेत बिबट्या असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा बिबट्या मृत अवस्थेत होता. त्याच्या अंगावर किडे पडले होते. त्यामुळे या बिबट्याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा अशी शक्यता स्थानिक वनक्षेत्रपाल दर्शना पाटील यांनी व्यक्त केली आहे. मानद वन्यजीव संरक्षक अविनाश हरड आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले, असेही पाटील यांनी सांगितले. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे यापूर्वीही समोर आले होते. या भागात वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात एक बिबट्याचे चित्र टिपले गेले होते. मात्र तो हाच बिबट्या आहे का कि दुसरा याबाबत साशंकता असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dead leopard found near murbad zws
First published on: 09-02-2023 at 15:45 IST