‘केएफसी’च्या पाण्यात घातक विषाणू

केएफसीची शाखा असून तिथे गेल्या आठवडय़ात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने पाहणी केली होती.

नेरूळमध्ये खाद्यपदार्थ विक्रीस बंदी; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
खाद्यपदार्थ विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘केएफसी’ कंपनीच्या नेरूळ येथील शाखेवर अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी कारवाई केली आहे. या शाखेमध्ये खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये ई-कोलाय आणि कॉलीफॉर्म हे विषाणू आढळून आले असून नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याने शाखेतील खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे ठाण्यातील साहाय्यक आयुक्त किशोर गोरे यांनी दिली.
नेरूळ येथील डी.वाय.पाटील प्रेक्षागृह परिसरात केएफसीची शाखा असून तिथे गेल्या आठवडय़ात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने पाहणी केली होती. या शाखेमध्ये खाद्यपदार्थ बनविण्यासाठी कंपनीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी वापरले जाते. त्यावेळी शाखेमध्ये उपलब्ध असलेल्या या पाण्याच्या तपासणीचे अहवाल पथकाने तपासले होते. त्या अहवालामध्ये ई-कोलाय आणि कॉलीफॉर्म हे घातक विषाणू असल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली होती. या पाश्र्वभूमीवर पथकाने कंपनीला पुन्हा पाण्याची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनीने दुसऱ्यांदा पाण्याची तपासणी करून घेतली. या तपासणी अहवालामध्ये पुन्हा हे विषाणू आढळून आले. पाण्यामध्ये या विषाणूंचे प्रमाण एकतृतीयांश इतके असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे अखेर अन्न व औषध प्रशासन विभागाने या शाखेतील खाद्यपदार्थ विक्रीस बंदी घातली आहे.
बर्फ, थंड कॉफीतून प्रसार
पाण्यातील या विषारी घटकांचे प्रमाण शिजवून केलेल्या खाद्यपदार्थामध्ये दिसत नसले तरी बर्फाचे खडे, सरबत आणि बर्फाचे थंड कॉफी यासारख्या पदार्थामध्ये हे प्रमाण दिसून येते. यामुळे येथील ग्राहकांच्या आरोग्यास धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पाश्र्वभूमीवर या शाखेतील खाद्यपदार्थ विक्रीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती साहाय्यक आयुक्त किशोर गोरे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deadly virus found in kfc water