ठाणे : ठाण्यातील एका जिवंत शिक्षकाला त्याच्याच मृत्यूचा दाखला घेण्यासाठी महापालिकेने बोलावण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून त्यापाठोपाठ आणखी काही नागरिकांना पालिकेकडून अशा प्रकारे कॉल आल्याचे समजते. यामुळे शहरात गोंधळाचे वातावरण आहे. या प्रकारानंतर खडबडून जाग आलेल्या पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली असून त्यात शासनाकडून आलेल्या मृत व्यक्तींच्या याद्यांमध्ये जिवंत व्यक्तींचा समावेश कसा झाला, याची माहिती घेण्यात येत आहे.

घोडबंदर येथील मानपाडा भागात चंद्रशेखर देसाई (५५) हे राहतात. ते मुंबईतील एका शाळेत शिक्षक आहेत. ८० वर्षांची आई, पत्नी आणि तीन मुले असा त्यांचा परिवार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांना करोनाची लागण झाली होती. सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांनी घरीच उपचार घ्यायचे ठरविले. एका मित्राची खोली रिकामी होती. या खोलीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी १४ दिवस उपचार घेतले. बरे झाल्यानंतर ते पुन्हा घरी परतले. तब्बल दहा महिन्यांनंतर त्यांना पालिकेच्या कॉल सेंटरमधून एक कॉल आला. कॉल सेंटरमधील प्रतिनिधीने त्यांचे नाव आणि पत्ता याची खातरजमा केली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्याच मृत्यूचा दाखला घेण्यासाठी बोलावले. या प्रकारामुळे बसलेल्या धक्क्य़ातून सावरत त्यांनी जिवंत असल्याचे सांगताच प्रतिनिधीने फोन ठेवून दिला. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

करोना रुग्णांची माहिती आयसीएमआरकडून गोळा करण्यात येते आणि ती अ‍ॅपमध्ये नोंदविण्यात येते. या माहितीच्या आधारे पुण्याच्या आरोग्य विभागाकडून संबंधित माहितीची खातरजमा करण्यात येते. त्यामुळे या प्रकरणात महापालिकेची काहीच चूक नाही. तरीही हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची आम्ही माहिती घेत आहोत.

– संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका