ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यातील गोरखगडावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय तरुणीचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आपल्या मित्रांसोबत गोरखगडावर गिर्यारोहण करत असताना या तरुणीचा तोल गेला आणि त्यामुळे ती थेट दरीत कोसळली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती तरुणीसोबत असलेल्या मित्रांनी पोलिसांना दिली. या तरुणीचे नाव दामिनी दिनकरराव असल्याची प्राथमिक माहिती या शोध मोहिमेत सहभागी असलेल्या जीवरक्षक दलाच्या सदस्यांनी दिली. ही तरुणी शहापूर तालुक्यातील उंभ्रई गावातील असल्याची माहिती मिळाली आहे. मुरबाड पोलीस, जीवरक्षक दलाचे शहापूर गट आणि स्थानिक देहरी ग्रामस्थांकडून या तरुणीची शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत राबवण्यात आली. तरुणीचा मृतदेह सापडला असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली. हेही वाचा : ठाण्यात घरमालकाच्या मारहाणीत संशयित चोरट्याचा मृत्यू, पोलिसांकडून आरोपीला अटक तरुणी दरीत कोसळल्याने नक्की कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र फोटो काढताना तोल गेल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.