कल्याण मधील वालधुनी येथील अशोक नगरमधील बुध्द भूमी फाऊंडेशनची जमीन ही आमच्या मालकीची आहे असे गेल्या १६ वर्षापासून बुध्द भूमी फाऊंडेशनच्या बौध्द धर्मगुरुंना सांगून वेळोवेळी त्यांना जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करुन जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या भागातील एका रहिवाशाने बुधवारी संध्याकाळी बौध्द धर्मगुरुंना जाती वाचक शिवागाळ करत मारहाण करत त्यांना जागेतून हुसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना जीव ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील भोपर गावातील घराला भीषण आग; चार जण होरपळले

तपस्वी बौध्द भिख्खुंना त्रास देणाऱ्या नागरिकावर कठोर कारवाई करण्याची मागणी अन्य बौध्द संघटनांनी केली आहे. बुध्द भूमी फाऊंडेशनचे भन्ते गौतम रत्न थेरो (३९) यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात जमिनीवर दावा करणाऱ्या अशोकनगर वालधुनी भागातील रहिवासी सुरेंद्र नारायण चिखले उर्फ लंगड्या, त्याचा मुलगा राज, सरोदे इतर तीन इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले, आरोपी सुरेंद्र चिखले हा गेल्या अनेक वर्षापासून बुध्द भूमी फाऊंडेशनची वालधुनी येथील जमीन आपल्या मालकीची आहे. तेथील बुध्द पुतळे काढून टाका असे सांगून जमिनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी वेळोवेळी तो बळाचा वापर करतो. याप्रकरणी त्याने न्यायालयात दावा दाखल केला होतो तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. बुधवारी संध्याकाळी सुरेंद्र चिखले त्याचा मुलगा राज, सरोदे इतर तीन जण असे बुध्द फाऊंडेशनच्या वालधुनी अशोकनगर येथील जागेत येऊन तक्रारदार बौध्द भिख्खु भन्ते थेरो यांना शिवीगाळ करुन लागले. या जागेतून त्यांना निघून जाण्याची मागणी करू लागले. तुम्ही निघून गेला नाहीत तर तुम्हा सर्वांना ठार मारीन अशी धमकी दिली. जातीवाचक शिवीगाळ करुन भन्ते यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. भन्ते यांनी पोलिसांना संपर्क केला तेव्हा पोलीस आम्हाला काही करू शकत नाही अशी भाषा करु लागला. परिसरातील लोक धावत बौध्द भिख्खुंना पाठिंबा देण्यासाठी येत असल्याचे पाहून सुरेंद्र आणि इतर मारेकर वाहनातून पळून गेले. भन्ते यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मारहाण, परवानगी न घेता जागेत शिरकाव करणे, ॲट्रोसिटी कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.