बदलापूर: अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर परिसरातील नागरिकांना नव्या मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. मेट्रो १४ प्रकल्पाचा विस्तार केला जाणार असून ही मेट्रो चिखलोली रेल्वे स्थानकापासून सुरू होऊन कल्याण-बदलापूर राज्यमार्गावरून जिएनपी मॉलपर्यंत जाणार आहे. तसेच, मेट्रो ५ ही ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गे दुर्गाडी नाक्यापासून बिर्ला महाविद्यालय मार्गे शहाड, उल्हासनगर, शांतीनगर, कल्याण बदलापूर रस्त्यावर जिएनपी मॉलपर्यंत विस्तारित होणार आहे.
यामुळे या भागातील रहिवाशांना थेट आणि जलद मेट्रो सेवा मिळणार असून, चिखलोली हे एक प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसित होणार आहे. सोबतच चिखलोली रेल्वे स्थानकात रेल्वे आणि मेट्रो सेवांचे एकत्रीकरण होणार असून, येथील स्थानक आधुनिक आणि सुसज्ज पद्धतीने उभारले जाणार आहे. यासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएला दिल्या आहेत.
एमएमआरडीएच्या मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. या बैठकीला अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही या प्रकल्पासाठी मागणी केली होती.
मेट्रो ५ आणि मेट्रो १४ या प्रकल्पांच्या विस्तारित टप्प्यांमुळे कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि बदलापूर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि लोकल गाड्यांवरील ताण कमी होईल. या दोन्ही मार्गांचे विस्तारीकरण झाल्याने कांजुरमार्ग मेट्रोचा प्रवासी उल्हासनगर, भिवंडीमार्गे ठाण्याला जाऊ शकेल. तर उल्हासनगरच्या प्रवाशाला चिखलोली स्थानकातून मुंबईला जाता येणार आहे. शिवाय, पर्यावरणपूरक मेट्रोमुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळेल. या प्रकल्पांमुळे स्थानक परिसरात वाणिज्य, सेवा उद्योग आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल. या मेट्रो प्रकल्पांचा उद्देश केवळ वाहतूक सुधारणा नसून, एकत्रित नागरी विकास साधणे हा आहे.
प्रकल्पाची प्रगती आणि भविष्य
सध्या या दोन्ही विस्तारित मेट्रो प्रकल्पांचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार होत असून, लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होईल. चिखलोली येथे रेल्वे स्थानकाचे काम वेगाने सुरू असून, येत्या काही दिवसांत ही सेवा नागरिकांना उपलब्ध होईल. मेट्रो १४ आणि मेट्रो ५ च्या विस्तारामुळे अंबरनाथ आणि उल्हासनगर येथील नागरिकांना थेट मुंबई आणि ठाणे गाठणे सोपे होईल. या प्रकल्पांमुळे ‘एक शहर, एक मेट्रो नेटवर्क’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे.
प्रतिक्रिया
“बदलापूर आणि अंबरनाथमधून मुंबई आणि ठाणे येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे स्थानकांवर प्रचंड गर्दी होत आहे. चिखलोली रेल्वे स्थानक आणि मेट्रो सेवेमुळे हा ताण कमी होईल. यामुळे प्रवास सुलभ आणि जलद होईल,” असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
चिखलोली: नवे ट्रान्सपोर्ट हब
चिखलोली येथे मेट्रो १४ आणि मेट्रो ५ च्या विस्तारित मार्गिकांवर स्थानकांसह एक आधुनिक ट्रान्सपोर्ट हब विकसित होत आहे. यामुळे रेल्वे आणि मेट्रो एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुसंगत आणि सोयीचा होईल. हा प्रकल्प कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम देणारा ठरणार आहे.