निखिल अहिरे
ठाणे : पावसाळा तोंडावर असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून विविध फळझाडांची लागवड करण्यासाठीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. यासाठी लागणारी रोपे शेतकरी आपल्या नजीकच्या रोपवाटिकांमधून खरेदी करत असतात. मात्र अनेक वेळेस रोपवाटिका धारकांकडून ऐन हंगामाच्या काळात या रोपांची चढय़ा दराने विक्री करण्यात येते. रोपवाटिका धारकांच्या या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी कृषी विभागातर्फे सर्व प्रकारच्या रोपांचे शासकीय दर निश्चित करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी नोंदणीकृत रोपवाटिकाधारकांना याच दराने रोपांची विक्री करणे आता बंधनकारक असणार आहे.
जिल्हा कृषी विभागातर्फे यंदा ठाणे जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत १०८० हेक्टरवर फळबागांचे आणि फुलबागांचे नियोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा विविध उपायोजना राबवत कृषी विभागाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात आंब्यासह विविध फळांची मोठी लागवड केली जात आहे. यासाठी लागणारी रोपे शेतकरी नजीकच्या रोपवाटिकांमधून खरेदी करत असतात.
हंगाम असल्याने या रोपांचीदेखील चांगली मागणी असते. याचाच फायदा घेत अनेक रोपवाटिकाधारकांकडून रोपांची चढय़ा दराने विक्री केली जाते. यामुळे याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील नोंदणीकृत रोपवाटिकांमध्ये फळांची, फुलांची तसेच काही फळभाज्यांची एकूण २ लाख २३ हजार ५०० रोपे उपलब्ध असून अधिकच्या रोपांची यंदा आवश्यकता भासणार आहेत. यामुळे रोपवाटिकाधारकांकडून रोपांची चढय़ा दराने विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागातर्फे सर्व रोपांचे शासकीय दर जाहीर करण्यात आले असून ठरविलेल्या दरातच रोपवाटिकाधारकांना विक्री करावी लागणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचणार आहे.
जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत रोपवाटिकाधारकांना शासनाने ठरवून दिलेल्या दरातच रोपांची विक्री करावी लागणार आहे. या दरम्यान कोणत्याही रोपवाटिकाधारकाने चढय़ा दराने विक्री केलेले आढळय़ास त्याचा परवाना रद्द करण्यात येणार असून त्यावर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात येईल. – मोहन वाघ, कृषी अधिकारी, ठाणे
रोपांचे शासकीय दर (किंमत – रुपयांमध्ये)
ल्ल आंबा – ८०, काजू – ६०, चिकू-९०, पेरू – ६०, कागदी िलबू रोपे (पिशवीतील)- ३५,
ल्ल सीडलेस लिंबू कलमे – ४०, आवळा कलमे- ५०, आवळा रोपे- २०, चिंच कलमे (विकसित)- ७०, कोकम कलमे- ४०,
ल्ल नारळ रोपे (बाणावली व इतर)- १००, नारळे रोपे – १२०, नारळ रोपे पिशवीतील – २००, सुपारी रोपे – ३५,
ल्ल खिरणी रोपे – २५, मिरी रोपे – २०, दालचिनी कलमे – ४०, लवंग रोपे – ३५, जायफळ कलमे – ६०, तेलताड रोपे – ४०,
ल्ल फणस कलमे- ५०, लिची रोपे – २५, सीताफळ कलमे – ५०, अंजीर कलमे- ४०, जांभूळ कलमे – ७०, करवंद कलमे – ५०,
ल्ल आंबा, संत्री, मोसंबी, बोर, चिकू, काजू, चिंच, आवळा काठी – ८ रुपये, पानिपपरी कलमकांडी दोन रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision price hike of nursery holders price fruit trees under government control amy
First published on: 24-05-2022 at 01:45 IST