कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमधील सहा ठिकाणी प्रवास सुरक्षित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किशोर कोकणे

ठाणे : कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ क्षेत्रात रस्त्याच्या कामांमुळे सहा अपघाती क्षेत्रांमध्ये घट झाली आहे. अंबरनाथ येथील जांभुळ फाटा, कल्याण-डोंबिवली येथील दवडीनाका, विकोनाका, निसर्ग ढाबा, कोनगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंप आणि मुंब्रा येथील रेहमानिया रुग्णालय परिसर अशी घट झालेल्या अपघाती क्षेत्रांची नावे आहेत. या भागात गेल्या तीन वर्षांत पाच किंवा त्यापेक्षा जास्त अपघातांची नोंद झालेली नाही.

ठाणे जिल्ह्यातून राज्य, राष्ट्रीय महामार्ग जातात. तसेच इतर अंतर्गत रस्त्यांचेही मोठे जाळे जिल्ह्यात पसरलेले आहे. परंतु बेदरकारपणे वाहने चालविल्याने किंवा दुसऱ्या वाहन चालकाच्या चुकांमुळे अपघाताचे प्रमाण अधिक असते. तर काही रस्त्यांवरील त्रुटीमुळेही अपघातात घडत असतात. एखाद्या रस्त्यावर पाचशे मीटर अंतरापर्यंत तीन वर्षांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त जणांचा अपघातात मृत्यू झाला. तसेच वाहन चालक गंभीर जखमी झाल्यास या भागाची नोंद वाहतूक पोलिसांकडून केली जाते. त्यानंतर याची माहिती राज्य सरकारकडे दिले जाते. त्यानंतर या क्षेत्राची अपघाती क्षेत्र म्हणून घोषित केले जाते. संबंधित रस्त्यावर कोणती दुरुस्ती केली जाणे आवश्यक आहे. याचा अभ्यास केला जातो. त्यानुसार हा रस्ता ज्या प्राधिकरणाकडे आहे. त्या प्राधिकरणाकडून या भागात दुरुस्ती केली जाते. ठाणे पोलीस आयुक्तालय भागातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात ३७ अपघाती क्षेत्रांची नोंद करण्यात आली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये केलेल्या नव्या नोंदीनुसार यामध्ये सहा अपघाती क्षेत्र घटल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ येथील जांभुळ फाटा, कल्याण-डोंबिवली येथील दवडीनाका, विक्कोनाका, निसर्ग ढाबा, कोनगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंप आणि मुंब्रा येथील रेहमानिया रुग्णालय परिसरातील सहा अपघाती क्षेत्र घटल्याचे माहिती समोर आली आहे. या परिसरात रस्त्याची दुरुस्ती, वाहतूक कोंडी यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन अपघात घडले नाही.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात केवळ ३१ अपघाती क्षेत्र शिल्लक आहेत. अनेकदा महामार्ग किंवा मुख्य रस्ते यावर वाहन चालविताना बेदरकारपणे वाहने चालविली जातात. त्यामुळे अपघात होऊन अपघाती क्षेत्र तयार होतात. परंतु ज्या ठिकाणी रस्त्याचे कामे सुरू असतात. त्या ठिकाणी वाहनांचा वेग मंदावतो. त्यामुळे अपघात घडत नसतात. असेही अधिकाऱ्याने सांगितले.

ठाण्यात धोका कायम

 घोडबंदर मार्गावर अपघाती क्षेत्र कायम आहेत. या मार्गावर माजीवडा ते गायमुख या भागात एकूण सहा अपघाती क्षेत्र आहेत. त्यामध्ये ब्रह्मांड सिग्नल, माजीवडा, गायमुख, ओवळा सिग्नल, वाघबीळ, कापूरबावडी येथील विजय सेल्स दुकानासमोरील रस्त्याचा सामावेश आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decrease accidental areas road works ysh
First published on: 25-01-2022 at 00:23 IST