आरोग्य विभागाला उपाययोजना सुरळीत ठेवण्याच्या सूचना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: ग्रामीण भागात करोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी नियमित लसीकरण, सर्वेक्षण, चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. सध्या ग्रामीण भागात १५८ सक्रिय रुग्ण आहेत. करोना रुग्णसंख्येत दिवसागणिक होणारी घट दिलासादायक बाब असली तरी करोनाच्या नियंत्रणासाठी करत असलेल्या उपाययोजना सुरळीत ठेवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सर्व विभागांची नुकतीच विषयनिहाय बैठक घेऊन महत्त्वाकांक्षी असणाऱ्या विविध योजना, उपक्रम, अभियानाचा सखोल आढावा घेतला.

या आढावा बैठकीत डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबविण्याचेदेखील निर्देश दिले आहेत. तसेच स्वच्छ भारत सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी सर्व स्थानिक यंत्रणांनी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका जिल्ह्यातील ग्रामीण भागांना बसला होता. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध उपाययोजना करण्यात येत होत्या. त्यामुळे गावांमधील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात जिल्हा परिषदेला यश आले. त्याचबरोबर करोनाबाबत जिल्हा परिषदेकडून जनजागृती करण्यात येत होती. त्यास नागरिकांनीही प्रतिसाद दिला. तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांनी गावागावांमध्ये फिरून ताप तपासणी सर्वेक्षण केले. सर्वेक्षणामुळे वेळीच बाधित रुग्णांची ओळख होण्यास मदत झाली आणि त्यांना त्वरित उपचार मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावं करोनामुक्त झाली आहेत. ग्रामीण भागातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागात नियमित लसीकरण

जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर या पाचही तालुक्यांत नियमित लसीकरण सत्र सुरू असून आजपर्यंत ८ लाख ९४ हजार ६९२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये ६ लाख ८१ हजार ६३२ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे, तर २ लाख १३ हजार ६० नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decrease in the number of patients in rural areas measures to the health department notice akp
First published on: 28-10-2021 at 00:19 IST