वसई-विरारमध्ये लवकरच हरीण पार्क

 विरार पूर्वेच्या शिरगाव येथे पहिला टप्प्यातील वनीकरण सुरू करण्यात आले आहे.

महापालिकेची संकल्पना; शिरगावमध्ये जंगल विकसित करणार

हरीण या प्राण्याचे नाव घेतले की आपल्या डोळय़ासमोर तुकतुकीत कांती, काळेभोर डोळे आणि चेहऱ्यावर निरागस भाव असलेला सुंदर प्राणी येतो. जंगलात आढळणाऱ्या या प्राण्याचे आकर्षण सर्वानाच असते. वसई-विरारमध्ये लवकरच तयार करण्यात येणाऱ्या ‘हरीण पार्क’मधून पर्यटकांना या सुंदर प्राण्याचे दर्शन होणार आहे. महापालिकेने ही अनोखी संकल्पना राबवली असून शहरात मानवनिर्मित जंगल तयार करून त्यात हे हरीण पार्क तयार करण्यात येणार आहे.

वसई-विरार शहराला समृद्ध निसर्गसंपदा लाभलेली आहे. पश्चिमेला निळाशार समुद्र आणि पूर्वेला हिरवीगार वनराई यामध्ये हे शहर वसलेले आहे. मात्र सिमेंटचे जंगल वाढत असल्याने या शहरातील हिरवाई हळूहळू नष्ट होत आहे. यावर तोडगा म्हणून महापालिकेने मानवनिर्मित जंगल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी ५० हेक्टर याप्रमाणे सात वर्षांत ३५० हेक्टर जंगल विकसित करण्यात येणार आहे. जंगल विकसित करण्याचे काम वन विभागाला देण्यात आले आहे. वन विभागाने जंगल विकसित करताना जेवढी झाडे लावली, त्याच्या ८० टक्के झाडे जगवण्याची जबाबदारी पालिकेला देण्यात आली आहे.

विरार पूर्वेच्या शिरगाव येथे पहिला टप्प्यातील वनीकरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे शहरात पुढील सात वर्षांत मानवनिर्मित जंगल तयार होणार आहे.

शिरगाव येथील वनात हरीण पार्क तयार करण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हरणांची पैदास करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याच वनात पक्षी उद्यानही तयार करण्यात येणार आहे. पक्षी कुठल्या झाडावर बसतात, कुठली फळे खातात, येथील वातावरणात कुठले पक्षी राहू शकतात, याचा अभ्यास करून हे उद्यान तयार करण्यात येणार आहे.

शहरात वनपर्यटनाची संकल्पना तयार केली आहे. त्याअनुषंगाने वन विभाग आणि तज्ज्ञांच्या मदतीने हरीण पार्क आणि पक्षी उद्यान तयार केले जाणार आहे. त्यामुळे वसईच्या पर्यटनात वाढ होईल आणि शहरातील पर्यावरणाचा समतोल कायम राखला जाणार आहे.

क्षितिज ठाकूर, आमदार, नालासोपारा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deer park in vasai virar vasai virar municipal corporation

ताज्या बातम्या