ठाणे : पाकिस्तानच्या आयएसआय आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या टोळीशी कथित सबंध असलेल्या दहशतवादी माॅड्यूलचा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथक आणि राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत हुजैफा हाशमी याला भाईंदरमधून अटक करण्यात आली होती.

बुधवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांच्या ट्रान्झिट वाॅरंटवर दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यास परवानगी दिली. ५ जूनला त्याला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात हजर केले जाणार आहे. दिल्लीसह मुंबई आणि देशातील अन्य संवेदनशील ठिकाणी हल्ल्याचा कट रचणाऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात त्यांच्याकडून शस्त्रे, हँडग्रेनेड आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास पथकांकडून सुरु असतानाच, महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेल्या ताकीर शेख आणि अरबाज खान यांच्यासोबत हुजैफा हा संपर्कात असल्याचे आढळून आले होते. तपासानुसार हुजैफाने त्यांना एकमेकांच्या संपर्कात आणले होते.

पथकांनी हुजैफा याला भाईंदर येथून अटक केल्यानंतर बुधवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. पथकाने न्यायालयासमोर काही डिजीटल पुरावे सादर केले. त्यानंतर न्यायालयाने हुजैफा याच्या तीन दिवसांच्या ट्रान्झिट वाॅरंटसह त्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या ताब्यात दिले.