Delivery of a woman in a local coach at Titwala railway station ysh 95 | Loksatta

टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यात महिलेची प्रसूती

टिटवाळा रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी एका महिलेची लोकलच्या डब्यात प्रसूती झाली.

टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यात महिलेची प्रसूती
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

कल्याण: टिटवाळा रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी एका महिलेची लोकलच्या डब्यात प्रसूती झाली. कसाराकडून ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने धावत होती. टिटवाळा रेल्वे सुरक्षा बळ, स्थानक व्यवस्थापक, महिला रेल्वे पोलीस यांच्या प्रयत्नाने महिलेला तात्काळ टिटवाळ्यातील श्री सिध्दीविनायक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी आई, बाळ सुखरुप असल्याचे सांगितले.

कसाराकडून पहाटे एक लोकल सीएसएमटी दिशेने धावते. शुक्रवारी सकाळी ही लोकल नेहमीप्रमाणे धावत होती. या लोकलमध्ये आटगाव रेल्वे स्थानकात प्रिया वाघमारे (३३) ही महिला चढली. त्या गर्भवती होत्या. त्या लोकलमधील प्रथम वर्गाच्या डब्यात बसल्या होत्या. अन्य महिला प्रवासी त्यांच्या सोबतीने प्रवास करत होत्या. खडवली रेल्वे स्थानक सोडल्यानंतर प्रिया यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. धावत्या लोकलमध्ये करायचे काय, असा प्रश्न सहप्रवासी महिलांना पडला. तोपर्यंत टिटवाळा रेल्वे स्थानक आले. तोपर्यंत प्रियाची प्रसूती झाली होती. प्रिया बसलेल्या महिला डब्यातील महिला प्रवाशांनी टिटवाळा स्थानक व्यवस्थापकांना तात्काळ घडला प्रकार सांगितला. लोकल काही वेळ थांबविण्यात आली.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २६० एड्सचे रुग्ण; इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या, एका क्लिकवर…

टिटवाळा रेल्वे स्थानकातील गस्तीवरील महिला रेल्वे पोलीस आर. डी. थोरात, पी. के. बांबळे यांनी लोकलच्या डब्यात जाऊन प्रियाला सुस्थितीत केले. तिचे बाळ ताब्यात घेतले. लोहमार्ग पोलीस विशाल देसले, राम पाचपांडे यांनी तातडीने एक रुग्णवाहिका बोलावून प्रियाला टिटवाळ्यातील सिध्दीविनायक रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी प्रिया आणि बाळाची वैद्यकीय तपासणी केली. दोघेही सुखरुप असल्याचे डाॅक्टरांनी सांगताच सह महिला प्रवासी, रेल्वे पोलिसांना समाधानाचा सुस्कारा सोडला. ही माहिती प्रियाच्या नातेवाईकांना देण्यात आली, असे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश ढगे यांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 15:49 IST
Next Story
घनकचरा व्यवस्थापनाऐवजी थेट कचऱ्याला ‘अग्नी’; अंबरनाथमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमांची ऐशीतैशी