ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा संवेदनशील क्षेत्र असलेल्या येऊरच्या जंगलातील टेकडीवर मुरूम माती वाहून नेण्यासाठी वन विभागाच्याच कर्मचाऱ्याने लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वन परिमंडळ अधिकारी विकास कदम असे लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मुरूमाच्या मातीने भरलेल्या १० गाड्या जंगलात सोडण्यासाठी त्याने सहा हजार रुपयांची लाच मागितली. घटनेमुळे येऊरच्या जंगलाचे लचके तोडण्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनच खतपाणी घातले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार हे २३ जानेवारीला येऊरच्या टेकडीवर मुरूमाने भरलेल्या गाड्या नेत होते. त्याचवेळी उपवन येथील येऊरच्या प्रवेशद्वारावर वन परिमंडळ अधिकारी विकास कदम यांनी त्यांच्याकडून १० गाड्यांचे प्रत्येकी ६०० असे एकूण सहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी याप्रकरणी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणाची पडताळणी केली असता विकास कदम याने लाच मागितल्याने निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून विकास कदम याला ताब्यात घेतले. मागील काही वर्षांपासून येऊरच्या जंगलात मोठ्याप्रमाणात बेकायदेशीरपणे बांधकामे उभी राहिली आहेत. येऊर संवेदनशील आणि शांतता क्षेत्र असूनही याठिकाणी रात्री उशीरापर्यंत पार्ट्या सुरू असतात. त्यामुळे येऊरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand bribe from forest department employee transport vehicles sensitive area of yeoor ysh
First published on: 31-01-2023 at 11:04 IST