कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात. पालिकेच्या नियंत्रणाखालील शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालय आणि इतर ३५ नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून रुग्ण सेवेचा कारभार सक्षमपणे चालावा. या सर्व व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन सेवेतील कर्तव्यकठोर वैद्यकीय आरोग्य अधिकारी कल्याण डोंबिवली पालिकेत नियुक्त करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ई. रवींद्रन यांच्याकडे केली आहे.
मागील वर्षभरात पालिकेचा आरोग्य विभाग विविध कारणांनी नेहमीच वादग्रस्त आणि चर्चेत राहिला. पालिका रुग्णालयातून रुग्णांना किरकोळ आजारासाठी मुंबई, ठाण्यात उपचारासाठी पाठविणे, रुग्ण पाठविताना त्यांना वेळेत पालिकेची रुग्णवाहिका उपलब्ध न होणे, गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यात हलगर्जीपणा झाल्याने पालिका रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात महिला प्रसूत होणे, रुग्णालयाच्या कारभारात समन्वय नसणे, असा अनागोंदी कारभार कल्याण डोंबिवली पालिका रुग्णालयाचा उघड झाला आहे.
आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या श्वान निर्बिजीकरण केंद्रात आर्थिक गैरव्यवहार करणे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामात अनियमितता उघड होणे, पालिका सेवेत असताना आपल्या मालकीचा गाळा नियमबाह्यपणे पुन्हा पालिकेला भाड्याने देऊन ऑफिस ऑफ प्राफिट कायद्याचा भंग करणे, असे प्रकार आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी केले आहे. या सगळ्या गैरप्रकारात आरोग्य विभागातील श्वान निर्बिजीकरण केंद्रात एक कर्मचारी मागील वर्षी आयुक्त अभिनव गोयल यांनी निलंबित केला. एका कर्मचाऱ्याला नोटीस बजावली आहे. तर एका कर्मचाऱ्याची पालिकेतील सेवा खंडित केली आहे. रात्रीच्या वेळेत शस्त्रक्रिया गृहांचा वापर काही डाॅक्टरांनी नियमबाह्यपणे केल्याचे प्रकार घडले आहेत. काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना रात्रपाळीचे कर्तव्य असताना ते कर्तव्यावर हजर झाले नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या उघडकीस आले आहे, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
पालिका आरोग्य विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी खमक्या आणि कठोर शिस्तीचा वैद्यकीय आरोग्य अधिकारी नसल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाचे धिंडवडे निघाले आहेत, त्यामुळे शासन सेवेतील अनुभवी वैद्यकीय आरोग्य अधिकारी कल्याण डोंबिवली पालिकेत नियुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी कुलकर्णी यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ई. रवींद्रन यांच्याकडे केली आहे. सचिव रवींद्रन यापूर्वी कल्याण डोंबिवलीत दोन वर्ष आयुक्त म्हणून कार्यरत होते. यापूर्वी शासन सेवेतील वैदयकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी शिस्तीने कारभार करून आरोग्य विभाग सक्षमपणे चालेल याची काळजी घेतली होती. डाॅ. बाबुजी, डाॅ. संजीव कांबळे हे शासन सेवेतील, पालिका सेवेतील डाॅ. स्मिता रोडे यांनी आरोग्य विभाग सक्षमपणे चालवून नागरिकांना दर्जेदार उत्तम आरोग्य सेवा मिळेल यादृष्टीने प्रयत्न केले होते. हे अधिकारी पालिकेतून गेल्यानंतर आरोग्य विभागाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

