scorecardresearch

ठाण्यातील तिरंगा रॅलीच्यानिमित्ताने राष्ट्रवादीतील मतभेदांचे प्रदर्शन

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा या मतदार संघातून २००९ मध्ये निवडणुक लढविली होती.

ठाण्यातील तिरंगा रॅलीच्यानिमित्ताने राष्ट्रवादीतील मतभेदांचे प्रदर्शन
( ठाण्याच्या राबोडी या मुस्लिम बहुल विभागात सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेली "तिरंगा रॅली" )

ठाण्याच्या राबोडी या मुस्लिम बहुल विभागात सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेली “तिरंगा रॅली” राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या रॅलीला मुल्ला यांचे राजकीय गुरु आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह पक्षाचे शहर पदाधिकारी उपस्थित राहिलेले नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानिमित्ताने ठाण्यातील राष्ट्रवादी पक्षातील मतभेदांचे प्रदर्शन दिसून आले.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा या मतदार संघातून २००९ मध्ये निवडणुक लढविली होती. त्यावेळेस मुंब्रा या मुस्लिम बहुल विभागात मुल्ला यांनी आव्हाड यांच्यासाठी जंगजंग पछाडले होते. मध्यतंरी आव्हाड आणि मुल्ला यांच्या काही कारणावरून मतभेद होऊन ते दुरावल्याचे चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या गोट्यात मुल्ला हे सामील झाल्याने आव्हाड कार्यकर्ते नाराज असल्याची कुजबूज शहरात होती. असे असतानाच, ठाण्याच्या राबोडी या मुस्लिम बहुल विभागात सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काढलेल्या तिरंगा रॅली काढली होती. या रॅलीमध्ये ७५ फूट लांबीचा तिरंगा घेऊन शेकडो विद्यार्थी, हिंदू, मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थी सैनिक, राष्ट्रपुरुषांची वेशभूषा करून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मुस्लिम बहुल भागातील ही पहिलीच तिरंगा रॅली असूनही त्यात नागरिकांनी प्रचंड सहभाग नोंदविला होता. या रॅलीला आव्हाड यांच्यासह पक्षाचे शहर पदाधिकारी उपस्थित राहीले नाहीत. तर, पक्षाचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मॅशाल रॅली काढली होती. या रॅलीत सुमारे पाचशेपेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाचपाखाडी, आग्रा रोड, राममारूती रोड, साईकृपा हॉटेल, तलावपाळी असा प्रवास करीत ही रॅली महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विसर्जित करण्यात आली. या रॅलीत मात्र जितेंद्र आव्हाड हे सामील झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या संदर्भात नजीब मुल्ला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.

राबोडी येथील तिरंगा रॅलीचे निमंत्रण होते. मात्र, पक्षाकडून मशाल रॅली काढण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मशाल रॅली काढली होती. तिरंगा रॅली ज्यावेळेत झाली, त्याचवेळेत मशाल रॅली झाली. त्यामुळे तिरंगा रॅलीत सहभागी होता आले नाही. – आनंद परांजपे ,ठाणे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.