scorecardresearch

शिष्यवृत्ती रखडवणाऱ्या महाविद्यालयांना नोटीस ; ठाणे जिल्ह्यातील तीन हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित

तीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी गतवर्षी केलेले अर्ज अद्याप महाविद्यालयीन स्तरावर रखडल्याचे समोर आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

निखिल अहिरे, लोकसत्ता

ठाणे :  जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमातीतील तसेच मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनातर्फे देण्यात येणारी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी गतवर्षी केलेले अर्ज अद्याप महाविद्यालयीन स्तरावर रखडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे समाज कल्याण विभागाने संबंधित महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अनुसूचित जाती, जमाती, मागास प्रवर्ग, भटकी विमुक्त जमाती, विशेष मागासवर्गीय या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अकरावी, बारावी तसेच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने भारत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना शासनाच्या महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करणे अनिवार्य असते. विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यांनतर महाविद्यालयीन स्तरावरून हा अर्ज मंजूर करून जिल्हा समाजकल्याण विभागाकडे पाठविण्यात येतो. त्यानंतर अखेरच्या मंजुरीसाठी हा अर्ज समाजकल्याण विभागाच्या मुख्य आयुक्तलयात पाठविण्यात येतो. त्यांच्यामार्फत मंजूर मिळाल्यांनतर विदयार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे जमा होतात.

दरवर्षी ऑगस्ट महिन्यानंतर राज्यभरात ही प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ही प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली होती. यानुसार २०२१-२२ साठी जिल्ह्यातील सुमारे ६५० महाविद्यालयांतून ४४ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र महाविद्यालयांच्या दिरंगाईच्या कारभारामुळे तब्बल ३ हजार ६०० विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयीन स्तरावरच रखडले आहेत. हे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अवघे नऊ दिवसांच्या कालावधीत शासनस्तरावरील विविध टप्पे पार करत शिष्यवृत्तीच्या अर्जाना मंजुरी मिळण्याबात विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अर्ज वेळेत दाखल झाला नसल्यास शिष्यवृत्ती रद्द होण्याची  विद्यार्थ्यांना भीती आहे.

समाजकल्याण विभागाने याची गंभीर दखल घेत महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच हे अर्ज मंजूर करण्याचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना आवाहन

विद्यार्थ्यांनीही कागदपत्रांची पूर्तता करावी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची विद्यार्थ्यांनीदेखील पूर्तता करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी विविध प्रमाणपत्रे आणि प्रामुख्याने आधार कार्डाशी संलग्न असलेले बँक खात्याचा तपशील अर्जात नमूद करणे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी याची नोंद घेणे महत्त्वाचे असल्याचे जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

अनेक विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन स्तरावर अर्ज रखडले आहेत. त्यामुळे महाविद्यालयांना प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्याबरोबरच कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आल्या आहेत. – बलभीम िशदे, साहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, ठाणे

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Department of social welfare issue notice to colleges for holding scholarships zws