ठाणे : गेल्या काही दिवसांपासून संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभेचा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपा, जद (यु) आणि लोजप (रामविलास) हे पक्ष एकत्रितपणे १९१ जागांवर आघाडीवर आहेत. तर, महाविकास आघाडीला फारशे यश मिळालेले नाही. बिहारमध्ये एनडीएला मिळालेल्या यशानंतर देशभरात जल्लोष सुरू झाला असून या निकालावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी प्रतिक्रिया व्यक्त केली असून त्यात बिहारच्या लाडक्या बहिणींचा उल्लेख केला आहे.
बिहारच्या जनतेने विकासाला प्राधान्य दिले, विकासावर विश्वास ठेवला, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कामावरही विश्वास ठेवला. “समोसे में जब तक रहेगा आलू, तब तक रहेगा लालू”, अशी पहिली घोषणा होती. पण, आता अशी वेळ आली आहे की “जब तक रहेगा आलू, तब तक रहेगा विकास का राज!” असे शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणींनी कमाल केली, विकासाला प्राधान्य दिले आणि म्हणूनच विकासराज सुरू राहणार आहे. लालू याचे जंगलराज जनतेने नाकारले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
विकासराजाची निवड
लालू यांच्या राज्यात परिस्थिती किती भयानक होती हे मी प्रचारादरम्यान प्रत्यक्ष पाहिले. संध्याकाळी सहा नंतर बाहेर पडता येत नसे, व्यापारी दुकाने लवकर बंद करत. दिवसाढवळ्या हत्या, लूट, बलात्कार घडायचे. हे सर्व बदलले आहे, असे लोक सांगत होते. म्हणनूच मला नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने चालणाऱ्या डबल इंजिन सरकारचे कौतुक करावे लागेल. जनतेने या डबल इंजिन सरकारवर विश्वास दाखवला आहे. बिहारचा हा विजय म्हणजे, मोदी यांच्या दूरदृष्टीचा, नितीश कुमार यांच्या कामांचा आणि बहिणींच्या विश्वासाचा आहे. बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा जंगलराज नाकारले आणि विकासराजाची निवड केली. काँग्रेसला तर विरोधी पक्ष नेतेपद मिळण्याइतकेही लोकांनी बळ दिले नाही, अशे शिंदे म्हणाले.
महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये बहुमत
नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रासह बिहारनेही ठाम विश्वास दाखवला. त्यात आमचे गृहमंत्री अमित शहा यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या चाणक्यनीतीने हे सर्व काम लोकांसाठी होत आहे. बिहारमध्ये अनेक वर्षांपासून झालेल्या विकासकामांना नितीश कुमार यांचा पाठिंबा आणि नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लाभले. हा विजय बिहारच्या जनतेचा, भगिनींचा, नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांचा आहे. हा विश्वासाचा विजय आहे. मतदार यादी पुनर्रचनेबाबत विरोधकांनी अनेक आरोप केले, परंतु पूर्ण प्रक्रिया पारदर्शक होती. काही लोक कायम टीका करण्यासाठीच असतात. महाराष्ट्रात जसा ठोस बहुमत मिळाले. तसेच बिहारमध्येही मिळाले. आम्ही एनडीएचे घटक आहोत. मी बिहारला गेलो असता मला लोकांनी प्रेमाने स्वीकारले आणि मला दिलेली जबाबदारी मी पार पाडली, असे शिंदे म्हणाले.
लाडक्या बहिणींनी बिहारलाही तारले
आमच्या लाडक्या बहिणींनी मनापासून मतदान केले. जसे महाराष्ट्रात दणदणीत यश मिळाले तसेच बिहारमध्येही मिळाले. कारण लोकांना जंगलराज नको आहे; लोकांना विकासराज हवा आहे. लाडक्या बहिणींचे विशेष अभिनंदन करतो. कारण लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून लोकतंत्राला बळ दिले. महाराष्ट्रात जसा लँडस्लाईड विजय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता, तसाच विजय बिहारमध्येही या लाडक्या बहिणींमुळे मिळाला. म्हणून मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारले, विकासराज स्वीकारले आणि त्यामुळेच असा भव्य विजय मिळाला आहे. जशी लाडकी बहीण योजना आपण महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवली, त्याच लाडक्या बहिणींनी बिहारलाही तारले. त्यांनी असा लँडस्लाईड विजय मिळवून दिला, असे शिंदे म्हणाले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती आपल्या कामाच्या जोरावर,विकासाच्या जोरावर, सर्वत्र दणदणीत विजय मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
