उल्हासनगरः ‘दोस्ती का गठबंधन’ म्हणत निवडणुकपूर्व युती जाहीर करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेना आणि कलानी गटाने पुढे साई पक्षालाही युतीत सोबत घेतले. भाजपला दूर सारत शहरात जागावाटपाचे सुत्रही निश्चित करण्यात आले. भाजपने हेच कारण पुढे करत युती नाकारली आणि स्वबळावर निवडणुकीची घोषणा झाली. मात्र उल्हासनगरात यात युतीतील पक्षांमध्ये समन्वय नसल्याची बाब समोर आली आहे.

उल्हासनगरतील प्रभाग क्रमांक ५ आणि ९ येथे धनुष्याबाण चिन्हावर लढणारे कलानी गटाचे उमेदवार आणि दूरदर्शन संच चिन्हावर लढणारे साई पक्षाचे उमेदवार एकाच प्रभागात आले आहेत. त्यामुळे शहरात एकीकडे युतीचा प्रचार सुरू असताना स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही चिन्हांचा प्रचार सुरू असल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

उल्हासनगर शहरात २०१९ पासून कलानी गटाने शिवसेनाला पाठिंबा दिला आहे. लोकसभा निवडणुकीतही हा पाठिंबा कायम होता. पालिका निवडणुकांची तयारी सुरू असतानाच कलानी गटाने शिवसेनेसोबत असलेली ‘दोस्ती का गठबंधन’ ही युती पुन्हा जाहीर केली. शिवसेनेनेही ही युती असल्याचे मान्य केले आणि त्यानुसार कलानी गटाला बळ दिले. त्यानंतर जीवन इदनानी यांच्या साई पक्षाने या युतीत जागा मिळवली. त्यामुळे तीन पक्षांनी आपापली निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मधल्या काळात युतीच्या चर्चा झाल्या मात्र कलानी विरोध, पूर्वनियोजीत जागावाटप अशा अनेक कारणांमुळे भाजपने युतीपासून अंतर राखले. त्यामुळेे कलानी गट आणि साई पक्षाने शिवसेनेसोबत जागावाटप ठरवून उमेदवार रिंगणात उतरवले. मात्र या प्रक्रियेतही गोंधळ झाल्याचे दिसून आले.

युती असुनही एकाच प्रभागात युतीतील दोन पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत हे अर्ज मागे घेतले जातील अशी आशा होती. मात्र तसे काहीही झाले नाही. त्यामुळे शहरात एकीकडे युतीचा प्रचार जोरात सुरू असताना प्रभाग क्रमांक ५, ९ येथे साई पक्षाच्या दूरदर्शन संच या चिन्हाच्या उमेदवारांसोबत धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढणारे उमेदवारही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मतदारामध्ये संभ्रम आहे. इथे समन्वयाचा अभाव प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर कलानी गटाकडून निवडणूक लढवत असलेल्या कविता मनोज लासी यांनी आपले नामनिर्देशन मागे घेतले नाही, असे बोलले जाते.

येथे साई पक्षाकडून माजी महापौर आशा जीवन इदनानी यांना उमेदवारी देण्यात आली होती. याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ५ क मध्ये कलानी गटाकडून सिमा कलानी तर साई पक्षाकडून त्याच प्रभागात जयश्री थावानी रिंगणात आहेत. ५ ड येथे साई पक्षाचे निष्ठावंत सुनील गंगवानी रिंगणात आहेत. तर याच प्रभागात शिवसेनेचे हरजिंदरसिंह भुल्लरही रिंगणात आहेत.