लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा येथील श्री गजानन महाराज मंदिराजवळील एका मोकळ्या जागेतील जुनाट झाडे तोडल्याची कबुली लेखी खुलाशाद्वारे विघ्नहर्ता पार्कचे विकासक आशीष मुंडे यांनी उद्यान विभागाला दिली आहे. पालिकेच्या उद्यान विभागाच्या परवानगीविना ही झाडे तोडली असून यामुळे उद्यान विभागाने विघ्नहर्ता पार्कचे विकासक मुंडे यांच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.

डोंबिवलीतील काही पर्यावरणप्रेमींनी ही झाडे तोडल्याप्रकरणी राज्याचा पर्यावरण विभाग आणि राष्ट्रीय हरित लवादाकडेही तक्रार केल्या आहेत. ही झाडे तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गरीबाचापाडा येथील पालिकेच्या जलकुंभांजवळील उद्यान आणि मिलेनियम पार्कच्या पाठीमागील भागातील मोकळ्या जागेतील गुलमोहोर, बदाम, तीन नारळाची झाडे, आंबा आणि अन्य अशी सात झाडे काही दिवसापूर्वी पालिकेच्या उद्यान विभाग, वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीविना अज्ञातांनी तोडली होती. लोकसत्ताने हे प्रकरण उघडकीला आणले होते.

हेही वाचा >>>बेकायदा नळजोडणीधारंकापाठोपाठ थकबाकीदारांवर कारवाई; ठाणे महापालिकेने थकबाकीदारांच्या ११ नळजोडण्या तोडल्या

पालिकेच्या उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, डोंबिवलीचे अधीक्षक महेश देशपांडे यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून ही झाडे कोणी तोडली याची चौकशी सुरू केली होती. झाडे तोडलेल्या जागेत विघ्नहर्ता पार्कचे आशीष मुंडे यांचा गृहप्रकल्प प्रस्तावित असल्याचे उद्यान अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. ही झाडे गृहप्रकल्प कामासाठी तोडली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करून मुख्य अधीक्षक जाधव यांनी विघ्नहर्ता पार्कचे विकासक मुंडे यांना झाडे तोडल्याप्रकरणी नोटीस बजावली होती.

मुंडे यांनी पालिकेच्या नोटिशीला उत्तर देताना, या झाडांच्या फांद्या सुकल्या होत्या. या भागातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्यांचा त्रास होत होता. काही झाडे धोकादायक होती, अशी तकलादू कारणे देऊन ती झाडे आपण तोडल्याची कबुली उद्यान अधिकाऱ्यांना दिली आहे. झाडे तोडल्याची कबुली स्वत: विकासकाने दिल्याने उद्यान विभागाने विकासक आशीष मुंडे यांच्यावर तोडलेल्या झाडांच्या बदल्यात दुप्पट झाडे लावणे आणि वृक्ष संवर्धन कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शासनाच्या नव्या नियमाप्रमाणे विकासकाला प्रती झाड ५० हजार रूपये दंड करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी सुरू केली आहे.

हेही वाचा >>>मराठवाड्याला प्रदूषित पाणी देणार का? उल्हास नदी बचाव कृती समितीचा राज्य सरकारला सवाल

या गृहप्रकल्पाला नगररचना विभागाने बांधकाम परवानगी दिली आहे. नगररचना विभागानेही त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत. गेल्या आठवड्यात देवीचापाडा येथील खाडी किनारी खारफुटी तोडून त्यावर मातीचे भराव टाकणाऱ्यांवर महसूल विभागाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खारफुटी, बेकायदा झाडे तोडणाऱ्यांवर शासन यंत्रणांनी कारवाई सुरू केल्याने भूमाफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

गरीबाचापाडा येथील झाडे तोडल्याची कबुली विघ्नहर्ता पार्कचे विकासक आशीष मुंडे यांनी दिली आहे. वृक्ष संवर्धन कायद्याने त्यांच्याकडून दुप्पट झाडे लावून घेणे आणि दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.- संजय जाधव, मुख्य उद्यान अधीक्षक.