ठाणे – मागील अडीच वर्षाच्या कालावधीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील रखडलेली विकासकामे येत्या काळात  प्राधान्याने पूर्ण करणार. असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. तसेच विकाकामासाठी पालिका प्रशासनाकडे येणारा निधी हा वापरला जात नसल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे पालिका प्रशासनाकडे असलेला निधी खर्च करून विकासकामांना गती देण्यासाठी सध्याचे राज्यातील सरकार प्रयत्नशील असल्याचे मत ही ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. मागील सलग तीन दिवस अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. या दौऱ्याच्या समारोपावेळी त्यांनी मंगळवारी उल्हासनगर येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा <<< महाराष्ट्रात झालेल्या फसवणुकीचा सत्तांतराने बदला घेतला; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची स्पष्टोक्ती

कल्याण लोकसभा मतदार संघात मागील दोन्ही  वेळेला भाजपाने दिलेल्या ताकदीमुळे शिवसेना आणि भाजप युतीच्या उमेदवार जिंकून आला आहे. येथे भाजपची ताकद मोठी आहे. तसेच येत्या काळात ही ताकद अजून वाढविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करतील. अशी स्पष्टोक्ती देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना यावेळी दिली. तसेच मागील अडीच वर्षाच्या कालावधीत कल्याण स्मार्ट सिटीची बहुतांश कामे संथ गतीने सुरू होती. येत्या काळात या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच पालिका प्रशासनाकडे असलेला निधी पडून न राहू देता त्याच्या तत्परतेने उपयोग केला जाईल. असे ठाकूर यावेळी म्हणाले. कल्याण लोकसभा मतदार संघात आगामी निवडणुकीत भाजपाचा की शिवसेनेचा उमेदवार उभा राहणारा याबाबत प्रश्न केला असता निवडणुकांना अजून बराच कालावधी आहे. त्यावेळी बघू असे सांगत ठाकूर यांनी या प्रश्नाला बगल दिली.