ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस हे ठाण्यात ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पाच्या शुभारंभासाठी मंगळवारी, आज (७ एप्रिल) ठाण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर घाटात रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे कार्य संबंधित विभागाकडून केले जात असल्याने त्याचा परिणाम घाटातील वाहतुकीवर झाला. घोडबंदर घाट परिसरात सकाळी वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले.

ठाणे शहरातून बोरिवली गाठण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगच्या घोडबंदर मार्गाने घोडबंदर घाट, फाऊंटन रोड येथून प्रवास करावा लागतो. घोडबंदर मार्गावरून ठाणे-बोरिवली बसगाड्या, एसटीची देखील सर्वाधिक वाहतुक होते. हे अंतर वळसा घालून असल्याने ठाणे ते बोरिवली हे अंतर गाठण्यासाठी सुमारे एक तास लागतो. वाहतुक कोंडी झाल्यास हे अंतर पार करण्यासाठी सुमारे दीड तास किंवा त्याहून जास्त कालावधी लागतो.

घोडबंदर मार्गावरून अवजड वाहनांची देखील वाहतुक होते. त्यामुळे येथील प्रवास धोकादायक देखील ठरतो. ठाणे ते बोरिवली हे अंतर वाहन चालकांना गाठता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (एमएमआरडीए) घोडबंदर येथील चितळसर मानपाडा जवळील मुल्लाबाग परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून दुहेरी भुयारी मार्ग तयार केला जात आहे.

हा मार्ग पूर्ण झाल्यास अवघ्या १५ मिनीटांत बोरिवली गाठता येईल असा दावा राज्य शासनाकडून केला जात आहे. या प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य सरकारमधील इतर मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.

अतिमहत्त्वाचे व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने घाट परिसरात तात्पुरती दुरुस्ती केली जात होती. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला. घोडबंदर येथील गायमुख घाट, चेना पूल भागात वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे ठाण्याहून मिरारोड, वसई, विरार, बोरिवली, दहिसरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्यांचे आणि तेथून ठाण्यात येणाऱ्यांचे हाल झाले.