ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने निर्माण केलेल्या घटनात्मक संस्था बदनाम करायच्या, त्यानंतर संविधान आणि लोकशाही नागरिकांना न्याय देऊ शकत नाही, असे जनतेच्या मनावर बिंबवायचे आणि अखेरीस चीनची लाल व्यवस्था भारतात आणायची, असे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ही व्यवस्था अल्ट्रा कम्युनिस्ट, अल्ट्रा लेफ्टिस्ट आणि लोकशाहीविरोधी असल्याचा दावा करत त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. चीनकडून काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या ट्रस्टला देणग्या का मिळतात, असाही सवाल त्यांनी केला.
ठाण्यात भाजपच्या वतीने रविवारी लोकतंत्र बचाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, प्रताप सरनाईक, जयकुमार रावल यांच्यासह महायुतीचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर निशाणा साधला. भारताला पाण्यात पाहण्यासाठी आतुर असलेल्या चीनकडून काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या ट्रस्टला देणग्या का मिळत आहेत, चीनच्या पैशावर भारतात अराजकता निर्माण करण्यासाठी तुम्ही उतरला आहात का, असा थेट सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना केला. एका हातात लाल संविधान दाखवायचे आणि दुसरीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने निर्माण केलेल्या घटनात्मक संस्थांना बदनाम करायचे, ही विरोधकांची रणनीती असल्याचा आरोपही त्यांनी केला.
देशात लोकशाही संपवून अराजकता निर्माण करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप करत या षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असे ते म्हणाले. विरोधकांकडून दाखवले जाणारे लाल संविधान हा केवळ मुखवटा आहे. त्यांचे खरे इरादे या लाल पुस्तकामागे दडलेले आहेत. या लाल पुस्तकाचा वापर करून नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमधील संविधान बदलण्याचे प्रयत्न झाले आणि आता तेच लाल पुस्तक घेऊन हे भारतात उतरले आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला.
लोक विचारतात की, तुम्ही रस्त्यावर का उतरला आहात, पण संविधानविरोधी लोक रस्त्यावर येणार असतील, तर त्यांचा मुकाबला करण्यासाठी आम्हीही रस्त्यावर उतरायला तयार आहोत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली, तर देशभक्त नागरिक मागे हटणार नाहीत. ही लढाई भाजप किंवा मोदी यांच्यापुरती मर्यादित नसून भारत आणि भारतीय संविधानाच्या रक्षणाची आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. एसआयआरच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याने काँग्रेस आणि विरोधक अस्वस्थ असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
काँग्रेसनेच संविधान चोरी केली
१९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाला निष्प्रभ करण्यासाठी काँग्रेस सरकारने संविधानात पूर्वलक्षी प्रभावाने बदल केले. पंतप्रधानांच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली. त्यानंतर १९७६ मध्ये आणखी घटनादुरुस्ती करून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर मर्यादा आणण्यात आल्या, असा आरोप फडणवीस यांनी केला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानेच देशात संविधानाची मोडतोड करण्यास सुरुवात केली. ‘मत चोरी, मत चोरी’ असा आरोप करणाऱ्या काँग्रेसनेच प्रत्यक्षात संविधानाची चोरी केली आहे. काँग्रेस हा संविधान चोरणारा पक्ष असून, संविधानाची मोडतोड करणाऱ्यांनी आज संविधान वाचवण्याची भाषा करू नये, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
