Legend of Ghodbunder Anandnagar Swami Math : ठाणे : घोडबंदर येथील आनंदनगर भागात ऋतू इन्क्लेव्हच्या बाजुला एका भल्या मोठ्या वडाच्या झाडाजवळ स्वामी समर्थांचा मठ आहे. पण, मठाच्या नावाखाली या जागेवर अतिक्रमण झाल्याचा दावा करत ठाणे महापालिका प्रशासनाने मठ हटविण्याची कारवाई घेतली.
यानंतर संतप्त झालेल्या समर्थांच्या भाविकांनी थेट ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश करून कारवाई रोखण्याची मागणी केली. तसेच स्वामी समर्थांची आरती गायली, तर काहींनी महापालिकेत खाली बसून ठिय्या मांडला. अखेर आयुक्त सौरभ राव यांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर भक्तांनी आंदोलन मागे घेतले. असे असले तरी यानिमित्ताने या मठाचे महत्व आणि त्याची आख्यायिका चर्चेत आली असून यामुळेच भक्तांकडून मठ हटविण्यास विरोध झाल्याचे बोलले जात आहे.
नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो. एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर दुसऱ्या बाजूला खाडीकिनारा असा हा निसर्ग संपन्न परिसर आहे. याचं भागातील आनंदनगर भागात ऋतू इन्क्लेव्हच्या बाजुला स्वामी समर्थांचा मठ आहे. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) या नावाने हा मठ चालविण्यात येतो. २००२ मध्ये या मठाची स्थापना झाली असून गेल्या काही वर्षात येथे भक्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेक भक्तांच्या म्हणण्यानुसार येथे स्वामींचे अस्तित्व आहे. मठात ध्यान, भजन, हवन आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात असून येथे दर्शन घेतल्याने मानसिक शांती आणि आरोग्यलाभ होत असल्याचे भक्तांकडून सांगण्यात आले.
मठात भाविकांची होते गर्दी
आनंदनगर येथील स्वामी समर्थांचा मठ २००२ मध्ये बांधण्यात आला. येथील पुजारी हरिभाऊ सूर्यवंशी आणि काही स्थानिक नागरिकांनी हा मठ स्थापन केला. हा मठ दिंडोरी प्रणित आहे. एका भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली हा मठ उभारण्यात आलेला असून येथे स्वामींचे फोटो पूजन आणि आरती नित्यनियमाने होते. येथे दररोज भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात, तर, गुरुवारी पाच हजाराहून अधिक भक्त येथे दर्शनासाठी येतात, असे स्वामी भक्त संतोष सकटे आणि संजय पाटील यांनी दिली.
मठाच्या कारवाईला विरोध
हा मठ म्हाडाच्या जागेत असून अनेक वर्षांपासून या जागेवरून वाद सुरु आहे. येथे उद्यान उभारण्याचे प्रस्तावित असून यामुळे हा मठ हटविण्याची कारवाई ठाणे महापालिकेने हाती घेतली होती. काही दिवसांपूर्वी येथील छत काढण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी गेले होते. या कारवाई दरम्यान नागरिकांनी एकत्र जमून कारवाई करु नये अशी आग्रही मागणी केली होती. तसेच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) मनोज प्रधान, ठाकरे गटाचे प्रदीप पुर्णेकर यांनी पाचपाखाडी येथील ठाणे महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार, सोमवारी मोठ्याप्रमाणात स्वामी समर्थ यांचे भाविक एकत्र आले होते. त्यांच्यासोबत मनोज प्रधान आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह इतर पक्षाचे कार्यकर्तेही होते. या सर्वांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश करत आंदोलन केले. यात महिलांचे प्रमाण अधिक होते. कारवाई करू नये या मागणीसाठी आंदोलकांनी स्वामी समर्थांच्या आरती गायली तर काहीजणांनी महापालिकेत ठिय्या मांडला होता. अखेर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वामी स्थानावर कारवाई केली जाणार नसल्याचे तोंडी आश्वासन दिल्यानंतर भक्तांनी आंदोलन स्थगित केले होते.
स्वामी मठाची आख्यायिका पालिकेच्या कारवाईच्यानिमित्ताने या मठाचे महत्व आणि त्याची आख्यायिका चर्चेत आली आहे. आनंदनगर भागात ऋतू इन्क्लेव्हच्या बाजुला एका भल्या मोठ्या वडाच्या झाडाजवळ स्वामी समर्थांचा मठ आहे. प्रवासादरम्यान या वडाच्या झाडाखाली स्वामी थांबले होते. २४ तास ते इथेच राहिले होते. याचा उल्लेख एका पुस्तकात संस्कृत भाषेत करण्यात आली आहे आणि याठिकाणी स्वामींचे अस्तित्व भक्तांना दिसून आले.
अनेकांना याची प्रचिती आल्याचे भक्त सांगतात. स्वामींच्या आख्यायिकेमुळे या मठात येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यांनाही चांगले अनुभव येत आहेत, अशी माहिती मठाचे पुजारी हरिभाऊ सूर्यवंशी यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली. तर, अख्यायिकेनुसार, या मठात स्वामींचे अस्तित्व असून त्याची प्रचिती भक्तांना आली आहे. यामुळेच स्वामींचे स्थान हटविण्यास भक्तांनी जोरदार विरोध केला, असे स्वामी भक्त संजय पाटील यांनी सांगितले.
