रेतीबंदर घाटावरील असुविधेबाबत गणेश भक्तांमधून व्यक्त होते नाराजी

 ठाणे :  गणेश मुर्तीं विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याबरोबरच विसर्जन घाटजवळ सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा ठाणे महापालिका प्रशासनाने केला असला तरी रेतीबंदर घाटावर गणेश मुर्ती विसर्जनासाठी भक्तांना टोकदार दगड आणि खड्यातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र आहे. या असुविधेबाबत गणेश भक्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

 गणेश मुर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. या कृत्रीम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, असे पालिकेने म्हटले होते. तसेच गणेश मुर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी(चेंदणी कोळीवाडा) कळवा पूल(निसर्ग उद्यान), कळवा(ठाणे बाजू), बाळकूम घाट आणि दिवा घाट असे एकूण ७ विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी महापालिकेच्यावतीने निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, गणेश भक्तांच्या वाहनांसाठी वाहन तळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु त्यापैकी रेतीबंदर घाटावर रस्त्याची दुरावस्था झालेली असून यामुळे गणेश मुर्ती विसर्जनासाठी भक्तांना टोकदार दगड आणि खड्यातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र आहे. याच मुद्द्यावरून पालिका प्रशासनांवर टीका होत आहे. महापालिकेने गणपती विसर्जनासाठी रेतीबंदर येथील विसर्जन घाटावर केलेली तयारी धक्कादायक आहे. गणपती विसर्जनाला नेताना  टोकदार दगड आणि खड्यातून जाताना भक्तांना मोठी कसरत करावी लागत आहे. कोट्यवधी रुपयांची अशी तयारी असेल तर आनंद आहे, अशी प्रतिक्रिया भक्तांमधून व्यक्त होत आहे.