ठाणे – देशाच्या इतिहासात प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणाऱ्या भारतीय जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात तयारीला वेग आला असून प्रशासनाने यासाठी सुसूत्र आणि बहुपातळी नियोजन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्त्वपूर्ण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज होत आहे.या पूर्वतयारीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात सोमवारी क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला.

देशभरात सुमारे दीड दशकांच्या कालावधी नंतर जनगणना प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेची सुरुवात स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. तहसिलदार (सर्वसाधारण) सचिन चौधरी यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या प्रशिक्षणाद्वारे जिल्ह्यातील तांत्रिक मनुष्यबळ सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ३२-३२ जणांच्या दोन तुकड्यांमध्ये एकूण ६४ क्षेत्रीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात असून हे प्रशिक्षण ११ एप्रिलपर्यंत चालणार आहे. कल्याण येथील तहसिलदार विनोद भामरे आणि तहसिलदार स्वाती घोंगडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देत आहेत.

या प्रशिक्षणामध्ये जनगणनाच्या पहिल्या टप्प्यातील घरयादी व घरगणना प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला आहे. यावेळी पारंपरिक कागदी पद्धतीऐवजी संगणकीय माध्यमांचा वापर करण्यात येणार असून प्रगणकांना शासनाच्या संगणक प्रणाली व मोबाईल अनुप्रयोगाच्या साहाय्याने माहिती संकलन करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य, जनगणना कायदे व नियम, तसेच अचूक माहिती नोंदणीची पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले जात आहे. हे प्रशिक्षित क्षेत्रीय प्रशिक्षक पुढील टप्प्यात २७ एप्रिल ते ८ मे दरम्यान जिल्ह्यातील नऊ विभागांतील सुमारे ४ हजार प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. यामुळे जिल्हाभरात एक सक्षम व प्रशिक्षित यंत्रणा उभी राहणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी डिजिटल जनगणनेमुळे माहिती संकलन अधिक पारदर्शक व अचूक होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच, यावेळी नागरिकांसाठी प्रथमच स्व-गणना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांनी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरयादी व घरगणनेचा पहिला टप्पा राबविण्यात येणार आहे.